प्रत्येक मध्यमवर्गीय व्यक्तीचं एक स्वप्न असतं—श्रीमंत होण्याचं. यासाठी तो आयुष्यभर मेहनत करत असतो, शिक्षण, नोकरी, व्यवसाय यामधून आर्थिक स्थैर्य मिळवण्याचा प्रयत्न करतो. मात्र केवळ मेहनतीने हे स्वप्न पूर्ण होईलच असं नाही. उत्पन्नासोबत योग्य आणि शिस्तबद्ध गुंतवणूक देखील अत्यंत महत्त्वाची आहे. तुमच्या मासिक उत्पन्नाचा एक ठराविक भाग अशी योजना निवडून गुंतवणूक करणे आवश्यक आहे, जिथे वेळेनुसार रकमेचा प्रचंड वाढ होण्याची शक्यता असते. आजच्या घडीला अशा अनेक गुंतवणूक पर्यायांमध्ये म्युच्युअल फंड हे एक प्रभावी साधन मानले जाते, विशेषतः एसआयपीद्वारे (Systematic Investment Plan).
म्युच्युअल फंडातील एसआयपीची संकल्पना
म्युच्युअल फंड हे सामूहिक गुंतवणुकीचं साधन आहे, जिथे अनेक गुंतवणूकदारांची रक्कम एकत्र करून ती अनुभवी फंड मॅनेजरमार्फत शेअर बाजार, बाँड्स, सरकारी सिक्युरिटीज अशा विविध साधनांमध्ये गुंतवली जाते. एसआयपी ही त्यातली एक सोपी आणि शिस्तबद्ध पद्धत आहे. यात गुंतवणूकदार दरमहा ठराविक रक्कम (उदाहरणार्थ ₹2000) गुंतवतो आणि काळानुसार त्यातून कंपाऊंडिंगच्या (मिश्र व्याज) जादूने मोठी रक्कम उभी होते. एसआयपीची खासियत ही आहे की अगदी ₹250 पासूनही गुंतवणूक सुरू करता येते, त्यामुळे कमी उत्पन्न असलेल्यांसाठीही हा पर्याय उपयुक्त ठरतो.
दरमहा ₹2000 गुंतवून कसे होऊ शकता कोट्यधीश?
आता आपण गणिताच्या माध्यमातून समजून घेऊ की, दरमहा ₹2000 गुंतवून तुम्ही कोट्यधीश कसे होऊ शकता. म्युच्युअल फंडातील सरासरी परतावा दीर्घकालीन स्वरूपात १२% ते १५% दरम्यान राहतो. आपण किमान १२% परताव्याचा अंदाज धरून या गणनेचा विचार करू.
जर तुम्ही दरमहा ₹2000 एसआयपीद्वारे गुंतवले, आणि ही गुंतवणूक तुम्ही सलग ३५ वर्षे चालू ठेवली, तर तुमची एकूण गुंतवलेली रक्कम असेल:
₹2000 x 12 महिने x 35 वर्षे = ₹8,40,000
या गुंतवणुकीवर जर तुम्हाला सरासरी १२% वार्षिक परतावा मिळाला, तर ३५ वर्षांनंतर तुमचं एकूण पोर्टफोलिओ मूल्य होईल सुमारे ₹1,10,21,662. यातील नफा असेल सुमारे ₹1.01 कोटी रुपये, म्हणजेच तुम्ही ₹8.4 लाखांची गुंतवणूक करून कोट्यधीश बनू शकता.
कंपाऊंडिंगची जादू
या यशामागे खरी ताकद आहे ती कंपाऊंडिंगची. जेव्हा तुम्ही कमवलेल्या व्याजावरही पुढे व्याज मिळतं, तेव्हा काळाच्या ओघात रक्कम exponential म्हणजेच गुंतागुंतीने वाढत जाते. सुरुवातीच्या काही वर्षांत वाढ मंद दिसते, पण १५-२० वर्षांनंतर कंपाऊंडिंगचा प्रभाव अधिक स्पष्टपणे जाणवतो. त्यामुळे एसआयपीमध्ये ‘लवकर सुरूवात करा आणि सातत्य ठेवा’ हीच यशाची गुरुकिल्ली आहे.