करदाते जेव्हा इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरतात, तेव्हा त्यात अनेकदा कर जास्त भरल्यामुळे किंवा TDS च्या स्वरूपात आधीच काही रक्कम वजा झाल्यामुळे सरकारकडून कर रिफंड मिळण्याची शक्यता असते. सामान्य परिस्थितीत, ITR फाईल केल्यानंतर २ ते ४ आठवड्यांत रिफंड मिळतो. मात्र, अनेक वेळा काही तांत्रिक किंवा प्रक्रियात्मक चुकांमुळे रिफंड अडतो किंवा विलंबित होतो. योग्य माहिती आणि दक्षता घेतल्यास या अडचणी टाळता येऊ शकतात.

ई-व्हेरिफिकेशनची प्रक्रिया पूर्ण न करणे
ITR फाईल केल्यानंतर सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे ई-व्हेरिफिकेशन. जर करदात्यानं ITR भरल्यानंतर ३० दिवसांच्या आत ई-व्हेरिफिकेशन केलं नाही, तर रिटर्न वैध मानलं जात नाही. यामुळे रिफंडची प्रक्रिया सुरू होत नाही. ई-व्हेरिफिकेशनसाठी Aadhaar OTP, नेट बँकिंग, डिमॅट खाते किंवा इतर डिजिटल माध्यमांचा वापर करून रिटर्नची पुष्टी करता येते. अनेक वेळा करदाता ई-व्हेरिफाय करायला विसरतो आणि त्याच्यामुळेच रिफंड लांबतो.

PAN आणि Aadhaar लिंक नसणे
सरकारने पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करणे अनिवार्य केलं आहे. जर ही लिंकिंग पूर्ण झाली नसेल, तर आयटीआर प्रक्रियेत अडथळे निर्माण होतात. विशेषतः रिफंडच्या बाबतीत विभाग हे वैयक्तिक ओळख तपासतो, आणि लिंकिंग नसेल तर तुमचं रिटर्न प्रक्रियेत अडतं. त्यामुळे रिफंड मिळण्यास विलंब होतो किंवा कधी कधी तो पुढे ढकलला जातो.

TDS च्या आकड्यांचा मेळ न बसणे
आयटीआर फाईल करताना फॉर्म 16 किंवा 26AS मध्ये दाखवलेले TDS आकडे आणि तुम्ही रिटर्नमध्ये भरलेली माहिती यामध्ये जुळवून पाहणं गरजेचं असतं. जर ह्या आकड्यांमध्ये विसंगती असेल, तर विभाग रिटर्न “defective” म्हणून घोषित करतो आणि रिफंड होण्याऐवजी तपासणीची प्रक्रिया सुरू करतो. त्यामुळे TDS च्या आकड्यांची योग्य पडताळणी करणे अत्यावश्यक असते.

बँक तपशील चुकीचा भरला जाणे
आयटीआर फाईल करताना करदात्याने दिलेला बँक खाते क्रमांक, IFSC कोड किंवा बँकेशी संबंधित इतर तपशील चुकीचे भरले गेल्यास रिफंड ट्रान्सफर होऊ शकत नाही. त्यामुळे खातं pre-validate केलं गेलं आहे की नाही याची खात्री करणे महत्त्वाचे आहे. हे खातं आधार किंवा पॅनशी जोडलेलं असणं देखील गरजेचं आहे.

रिटर्नमध्ये तथ्यात्मक चुका असणे
कधी कधी करदाता स्वतःच्या उत्पन्नाविषयी, डिडक्शन, गुंतवणूक किंवा इतर माहिती चुकीची भरतो. अशावेळी विभाग त्या रिटर्नला “defective return” घोषित करतो आणि त्या चुका सुधारण्यासाठी नोटीस पाठवतो. करदाता जर त्या चुका वेळेत सुधारत नसेल, तर रिफंड प्रक्रिया पूर्ण होत नाही आणि पैसे अडकतात.

रिफंड प्रोसेस कशी तपासावी?
करदात्याला आपला रिफंड मिळणार आहे की नाही, किंवा तो कोणत्या टप्प्यावर आहे हे जाणून घेण्यासाठी इनकम टॅक्सच्या अधिकृत वेबसाइटवर लॉगिन करून तपासणी करता येते. लॉगिननंतर “e-File” विभागात जाऊन “Income Tax Returns” या पर्यायावर क्लिक करावे. त्यानंतर संबंधित असेसमेंट वर्ष निवडून, त्या वर्षाच्या रिटर्नवरील acknowledgment नंबरवर क्लिक केल्यास रिफंडची स्थिती दिसून येते. याशिवाय विभाग ईमेल आणि एसएमएसद्वारे देखील रिफंडबाबतची माहिती देतो. जर रिफंड अडकलेला असेल, तर त्यामागील कारणांची माहितीही मेल किंवा पोर्टलवरून दिली जाते.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *