भारत आणि पाकिस्तानमधील शस्त्रसंधीच्या घोषणेनंतर भारतीय शेअर बाजारात प्रचंड तेजी अनुभवायला मिळाली आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सत्राची सुरुवातच मोठ्या उसळीने झाली. बीएसई सेन्सेक्स तब्बल १३४९ अंकांनी वाढून ८०,८०३ अंकांवर, तर निफ्टी ४१२ अंकांनी वाढून २४,४२० अंकांवर उघडला. याशिवाय, बँक निफ्टी १०६३ अंकांनी वधारून ५४,६५८ वर पोहोचला. या घसघशीत वाढीमुळे एकूण बाजारमूल्यात १० लाख कोटी रुपयांहून अधिक वाढ झाल्याचं आकडेवारी सांगते.

सेक्टरवाइज परफॉर्मन्स: फार्मा वगळता सर्वत्र तेजी

आजच्या सत्रात फार्मा क्षेत्र सोडल्यास सर्वच सेक्टोरल इंडेक्समध्ये जोरदार तेजी दिसून आली. निफ्टी ऑटो, मेटल, रिअल्टी, फायनान्शियल सर्व्हिसेस यामध्ये गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणावर खरेदी केली. विशेषतः मिडकॅप आणि स्मॉलकॅप कंपन्यांमध्ये तेजीने गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास परत आला आहे. बाजारात स्थिरता आणि सकारात्मक संकेत असल्यामुळे लहान व मध्यम कंपन्यांच्या शेअर्सनी झेप घेतली आहे.

अदानी पोर्ट्स, बजाज फायनान्स आघाडीवर; सनफार्मा घसरला

कामकाजादरम्यान अदानी पोर्ट्स, इटर्नल, बजाज फायनान्स, एल अँड टी आणि बजाज फिनसर्व्ह यांचे शेअर्स सर्वाधिक वधारले. या शेअर्समध्ये दिवसाच्या सुरुवातीलाच मोठा खरेदीचा ओघ पाहायला मिळाला. दुसरीकडे, सनफार्मा या फार्मा क्षेत्रातील दिग्गज कंपनीच्या शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण झाली. फार्मा सेक्टरच्या तुलनेत इतर सेक्टरमध्ये वाढ असल्यामुळे काही गुंतवणूकदारांनी नफा वसूल करत या शेअर्समधून बाहेर पडण्याचा मार्ग निवडला.

भारत-पाकिस्तान तणाव निवळण्याचा परिणाम बाजारावर

भारताच्या लष्करी कारवाईनंतर पाकिस्तानने माघार घेतल्याचं स्पष्ट झालं आहे. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताने पाकिस्तानचे आठ हवाई तळ उद्ध्वस्त केल्याचे वृत्त आहे. या कारवाईत १०० पेक्षा अधिक दहशतवाद्यांचा आणि ५० पाक सैनिकांचा अंत झाला आहे. यानंतर पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं आवाहन करण्यात आलं. भारत आणि पाकिस्तानचे डीजीएमओ आज दुपारी १२ वाजता हॉटलाइनवर चर्चा करणार आहेत. या घटनेमुळे भांडवली बाजारात सकारात्मक भावनांचा उद्रेक झाला आणि गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणावर खरेदी केली.

जागतिक घडामोडींचाही सकारात्मक परिणाम

फक्त उपखंडातील शांततेचं संकेतच नाही, तर जागतिक पातळीवरही सकारात्मक हालचाली सुरू आहेत. अमेरिका आणि चीन यांच्यात सुरू असलेला टॅरिफ संघर्ष आता संपण्याच्या मार्गावर आहे. अमेरिका चीनसोबत व्यापार करार करत असल्याचं व्हाईट हाऊसकडून जाहीर झालं आहे. यामुळे जागतिक बाजारांमध्येही तेजी दिसून आली आहे. गिफ्ट निफ्टी ५०० अंकांनी, डाऊ फ्युचर्स ४५० अंकांनी, तर जपानी निक्केई १०० अंकांनी वधारला आहे.

त्याचबरोबर, रशिया-युक्रेन संघर्षातही शांतीची आशा निर्माण झाली आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी झेलेंस्की यांना थेट चर्चेसाठी आमंत्रण दिलं आहे. ही सर्व परिस्थिती एकत्र येऊन भांडवली बाजारात आज मोठा उत्साह निर्माण करणारी ठरली.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *