Tata Upcoming SUVs : टाटा मोटर्स येत्या काळात आपल्या SUV लाईनअपमध्ये मोठा विस्तार करण्याच्या तयारीत असून, 2025 च्या अखेरीस एकामागोमाग पाच नवीन SUV मॉडेल्स भारतीय बाजारात दाखल होणार आहेत. यात पेट्रोल, डिझेल आणि इलेक्ट्रिक अशा विविध पॉवरट्रेनच्या गाड्यांचा समावेश असेल. ग्राहकांच्या गरजेनुसार विविध पर्याय देण्याच्या उद्देशाने टाटा ही रणनीती आखत आहे.

टाटा हॅरियर EV

सर्वात जास्त लक्ष वेधणारी SUV म्हणजे टाटा हॅरियर EV. ही गाडी 3 जून 2025 रोजी भारतात लाँच होणार असून, ती एका चार्जमध्ये 500 किमीहून अधिक रेंज देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. टाटाने या इलेक्ट्रिक SUV चे प्रदर्शन जानेवारी 2025 मध्ये झालेल्या इंडिया मोबिलिटी ग्लोबल एक्स्पोमध्ये केले होते. हॅरियर EV मध्ये 60 ते 75 किलोवॅट क्षमतेचा बॅटरी पॅक देण्यात येणार असून, ती पूर्ण चार्ज केल्यानंतर दीर्घ प्रवासासाठी सक्षम ठरेल.

हॅरियर पेट्रोल व्हर्जन

टाटाची दुसरी महत्त्वाची SUV म्हणजे हॅरियर पेट्रोल व्हर्जन. सध्या बाजारात केवळ डिझेल व्हर्जन उपलब्ध असलेली ही SUV लवकरच पेट्रोल इंजिनसह बाजारात येणार आहे. हे वाहन 1.5 लिटर क्षमतेच्या 3-सिलेंडर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिनसह सादर केले जाणार आहे. ही SUV अनेक वेळा चाचणी दरम्यान दिसली असून, तिचे लाँचिंग जुलै ते ऑगस्ट 2025 दरम्यान अपेक्षित आहे.

टाटा सफारी

टाटाची आणखी एक प्रतिष्ठित SUV म्हणजे सफारी. याचं देखील पेट्रोल व्हर्जन टाटा मोटर्स तयार करत आहे. यामध्येही 1.5 लिटर क्षमतेचं 3-सिलेंडर पेट्रोल इंजिन देण्यात येणार आहे. यामुळे आता डिझेल व्यतिरिक्त ग्राहकांना पेट्रोल विकल्पही उपलब्ध होणार आहे.

टाटा सिएरा ICE

सिएरा ही गाडी पूर्वीपासूनच भारतीय ग्राहकांमध्ये लोकप्रिय आहे आणि ती आता नव्या स्वरूपात पुन्हा बाजारात येत आहे. या SUV मध्ये 1.5 लिटर टर्बो पेट्रोल आणि 2.0 लिटर डिझेल इंजिनचा पर्याय उपलब्ध होणार आहे. ही गाडी ऑक्टोबर ते नोव्हेंबर 2025 दरम्यान लाँच केली जाण्याची शक्यता आहे. सिएरा ICE ही रेट्रो डिझाइनसोबत आधुनिक वैशिष्ट्यांनी युक्त SUV असणार आहे.

टाटा सिएरा EV

सर्वांत शेवटी, टाटाची सर्वात बहुप्रतिक्षित इलेक्ट्रिक SUV म्हणजे सिएरा EV. हिच्या बॅटरी रेंजबाबतही मोठे दावे केले जात आहेत. या SUV मध्ये 60 ते 75 किलोवॅट क्षमतेचा बॅटरी पॅक दिला जाणार असून, एका चार्जवर ती 500 किमीहून अधिक रेंज देऊ शकते. इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात टाटाचा हा आणखी एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.

एकूणच, 2025 पर्यंत टाटाच्या या पाच SUV भारतीय बाजारात दाखल होतील आणि विविध पॉवरट्रेन व आकर्षक वैशिष्ट्यांसह ग्राहकांना भरपूर पर्याय मिळतील. ICE आणि EV या दोन्ही विभागांमध्ये टाटा आपली पकड अधिक मजबूत करत आहे.

 

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *