रेमंड ग्रुपमध्ये मोठा बदल, गौतम सिंघानियांच्या पत्नीचा मोठा निर्णय
३२ वर्षानंतर काडीमोड
प्रसिद्ध उद्योगपती गौतम सिंघानिया आणि त्यांच्या पत्नी नवाज मोदी सिंघानिया यांनी ३२ वर्षांच्या संसारानंतर विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता. नोव्हेंबर २०२३ मध्ये त्यांनी हे अधिकृतरित्या जाहीर केले. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील या मोठ्या बदलानंतर आता व्यवसायिक पातळीवरही मोठी हालचाल झाली आहे. नवाज यांनी रेमंड लिमिटेडच्या संचालक मंडळाचा राजीनामा दिला असून, त्यामुळे कंपनीच्या व्यवस्थापनात मोठा बदल घडला आहे.
नवाज मोदी सिंघानिया यांचा राजीनामा
नवाज यांनी आपल्या राजीनामा पत्रात वैयक्तिक कारणांमुळे संचालक पद सोडत असल्याचे नमूद केले आहे. त्या म्हणाल्या, “संचालक मंडळाने दिलेल्या सहकार्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. कृपया माझा राजीनामा स्वीकारून आवश्यक प्रक्रियांची पूर्तता करावी.” त्यांच्या या निर्णयानंतर गौतम सिंघानिया यांनी देखील नवाज यांच्या योगदानाबद्दल आभार मानले आहेत.
गेल्या वर्षी ३ कंपन्यांमधून हटवण्यात आले
नोव्हेंबर २०२३ मध्ये विभक्त झाल्यानंतर एप्रिल २०२४ मध्ये नवाज यांना रेमंडच्या तीन प्रमुख खासगी कंपन्यांच्या संचालक मंडळावरून हटवण्यात आले होते. त्यामध्ये जेके इन्व्हेस्टर्स (जेकेआय), रेमंड कंझ्युमर केअर (आरसीसीएल), आणि स्मार्ट ॲडव्हायझरी अँड फिनसर्व्ह या कंपन्यांचा समावेश होता. नवाज यांनी या निर्णयाला विरोध दर्शवला होता, मात्र तरीही संचालक मंडळाने आपला निर्णय कायम ठेवला.
रेमंड ग्रुपमध्ये पुढील बदल
नवाज मोदी सिंघानिया यांच्या या राजीनाम्यानंतर रेमंड ग्रुपच्या व्यवस्थापनात आणखी बदल होण्याची शक्यता आहे. कंपनीच्या पुढील वाटचालीसाठी हे निर्णय महत्त्वाचे ठरतील. गौतम सिंघानिया आता रेमंडच्या विस्तारावर लक्ष केंद्रित करत असून, या व्यवस्थापनातील बदलांमुळे कंपनीच्या भविष्यात काय घडामोडी होतील, याकडे उद्योग जगताचे लक्ष लागले आहे.