आयटी क्षेत्रातील अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर टीसीएसचा निर्णय
गेल्या काही काळात भारतीय आयटी क्षेत्रातून अनेक नकारात्मक बातम्या समोर येत आहेत. नोकर कपात, मंदावलेली भरती प्रक्रिया आणि वेतनवाढीतील विलंब या सर्व गोष्टींनी कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता वाढवली आहे. इन्फोसिससारख्या दिग्गज कंपन्यांनी कर्मचार्यांच्या संख्येत कपात केली, त्यामुळे हा धक्का आणखी तीव्र झाला. मात्र अशा काळात टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ने आपले कर्मचाऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. कंपनीने त्यांच्या ७०% पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना १००% तिमाही परफॉर्मन्स बोनस (Variable Pay) देण्याचा निर्णय घेतला आहे.
टीसीएसचा नफा आणि कामगिरीत थोडीशी घसरण
मार्च २०२५ च्या तिमाहीत टीसीएसच्या निव्वळ नफ्यात १.७% घट झाली असून तो १२,२२४ कोटी रुपयांवर आला आहे. यामागचं प्रमुख कारण म्हणजे ऑपरेटिंग मार्जिनमध्ये झालेली घट. तरीही महसूलाच्या दृष्टीने कंपनीने मागील वर्षीच्या तुलनेत ५.३% वाढ नोंदवली आहे. याच तिमाहीत कंपनीने ६२५ नवीन कर्मचाऱ्यांची भरती करून आपली एकूण कर्मचारी संख्या ६.०७ लाखांवर नेली आहे. ह्यामुळे कंपनीची कर्मचारी संख्या वाढताना दिसत आहे, जी आजच्या संकटकाळात एक सकारात्मक बाब आहे.
पगारवाढीचा निर्णय पुढे ढकलला – कारण काय?
टीसीएसने यावर्षी वार्षिक पगारवाढ पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीच्या CHRO मिलिंद लक्कड यांच्या मते, सध्या बाजारातील अस्थिरतेमुळे आणि व्यवसायातील अनिश्चिततेमुळे हा निर्णय घ्यावा लागला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या काळात सुरू झालेल्या टॅरिफ धोरणाचा अप्रत्यक्ष परिणाम अद्यापही काही प्रमाणात जाणवतो आहे. त्यामुळे सध्या टीसीएसकडून कोणत्याही निश्चित वेतनवाढीची तारीख घोषित करण्यात आलेली नाही. पगारवाढ लांबणीवर गेली असली तरी काही कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता व तिमाही बोनस मिळाल्याने त्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
एआय आणि नोकऱ्यांचा धोका – टीसीएसची भूमिका
जगभरात आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे नोकऱ्यांवर गंडांतर येईल अशी भीती आहे. मात्र टीसीएसच्या एआय युनिटचे जागतिक प्रमुख अशोक क्रिश यांनी या भीतीला फाटा दिला आहे. त्यांच्या मते, एआयमुळे नोकऱ्या नाहीश्या होणार नाहीत, तर कामाच्या स्वरूपात बदल होईल. तंत्रज्ञानाच्या उदयामुळे नवीन प्रकारची कौशल्यं आवश्यक ठरणार असून, एआय हे कौशल्य विकासाचं साधन ठरणार आहे. त्यामुळे कर्मचार्यांनी स्वतःला अद्ययावत ठेवणं आणि नव्या तंत्रज्ञानात पारंगत होणं महत्त्वाचं ठरेल.