भारताच्या क्षेपणास्त्र हल्ल्याचा थेट परिणाम पाकिस्तानच्या शेअर बाजारावर
भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी पाकिस्तानच्या शेअर बाजारात भीषण घसरण पाहायला मिळाली. कराची स्टॉक एक्सचेंजचा प्रमुख निर्देशांक KSE100 तब्बल 6,272 अंकांनी (5.5%) घसरून 107,296.64 या नीचांकी स्तरावर पोहोचला, जो मंगळवारीच्या 113,568.51 च्या तुलनेत मोठी घसरण दर्शवतो.
‘पहलगाम हल्ल्या’नंतर सुरू झालेली घसरण अजूनही थांबलेली नाही
२२ एप्रिल रोजी काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या आर्थिक बाजारात सतत अस्थिरता पाहायला मिळत आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून पाकिस्तानच्या शेअर बाजारात एकूण ८ टक्क्यांपर्यंत घसरण झाली आहे. भारतात मात्र याच पार्श्वभूमीवर सेन्सेक्स आणि निफ्टीने तेजी गाठली असून, गुंतवणूकदारांनी स्थिरता आणि सामरिक ताकद असलेल्या भारतावर विश्वास दाखवला आहे.
ऑपरेशन सिंदूर: सामरिक कारवाईचा प्रभाव
भारताच्या लष्कराने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकव्याप्त काश्मीरमधील आणि पाकिस्तानातील नऊ प्रमुख दहशतवादी ठिकाणांना क्षेपणास्त्र हल्ल्यांद्वारे लक्ष्य केलं. यात बहावलपूरमधील जैश-ए-मोहम्मदच्या मुख्यालयासह लष्कर-ए-तोयबाच्या मुरीदके तळाचा समावेश आहे. या कारवाईमुळे पाकिस्तानात भीतीचं वातावरण आहे आणि त्याचा थेट परिणाम तिथल्या गुंतवणूकदारांच्या मनोवृत्तीवर झाला आहे.
गुंतवणूकदारांची मन:स्थिती आणि बाजारातील अस्थिरता
राजकीय आणि सामरिक अस्थिरतेमुळे गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास डळमळीत झाल्याचं चित्र स्पष्ट आहे. विदेशी गुंतवणूकदारही पाकिस्तानमधून पैसे काढून घेण्याच्या प्रक्रियेत असल्याचं संकेत मिळत आहेत. डॉलरच्या तुलनेत पाकिस्तानी रुपया आणखी कमकुवत होण्याची शक्यता आहे, जी देशाच्या आयात-निर्यात व्यापारावरही प्रतिकूल परिणाम करू शकते.