केंद्र सरकारने २०१५ मध्ये प्रधानमंत्री मुद्रा योजना (PMMY) सुरू केली होती. योजनेचा मुख्य उद्देश होता देशातल्या लघु आणि मध्यम उद्योगांना आर्थिक मदत करून त्यांना उभं करणं. यामध्ये सरकारकडून बिनतारण (Collateral-Free) कर्ज दिलं जातं. या योजनेअंतर्गत यापूर्वी केवळ १० लाख रुपयांपर्यंतचं कर्ज उपलब्ध होतं, परंतु अलीकडे सरकारने ही मर्यादा वाढवून २० लाख रुपये केली आहे. त्यामुळे आता लघु उद्योजक, स्टार्टअप सुरू करू इच्छिणारे तरुण-तरुणी आणि व्यवसाय वाढवू इच्छिणारे उद्योजक यांना अधिक मोठ्या प्रमाणात आर्थिक मदतीचा लाभ मिळणार आहे.

या योजनेची गरज आणि उपयोग

नवीन व्यवसाय सुरू करताना सर्वात मोठी अडचण म्हणजे भांडवलाची कमतरता. बहुतेक वेळा उद्योजकांकडे मालमत्ता नसते, जी गहाण ठेवून ते कर्ज मिळवू शकतील. अशा वेळी बिनतारण कर्ज ही संकल्पना त्यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरते. प्रधानमंत्री मुद्रा योजना हेच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून तयार करण्यात आली आहे. ही योजना केवळ नवीन व्यवसायांसाठीच नव्हे, तर आधीपासून अस्तित्वात असलेल्या व्यवसायांचा विस्तार करावयाचा असलेल्या उद्योजकांसाठीही लागू आहे. विविध क्षेत्रांतील सूक्ष्म उद्योग, दुकानं, सेवा व्यवसाय, शिल्पकला यासारख्या उपक्रमांना या योजनेचा मोठा आधार मिळतो.

कर्जाच्या श्रेण्या आणि त्यांचे स्वरूप

प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत, कर्ज तीन – आता चार – मुख्य श्रेणींमध्ये दिलं जातं. या श्रेण्या अर्जदाराच्या गरजेनुसार आणि व्यवसायाच्या टप्प्यानुसार विभागल्या आहेत.

  1. शिशु श्रेणी – ही श्रेणी नवीन व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी आहे. यामध्ये ५०,००० रुपयांपर्यंतचं कर्ज दिलं जातं. ज्यांना व्यवसायाची प्राथमिक गरज भागवायची आहे किंवा कमी भांडवलात उपक्रम सुरू करायचा आहे, त्यांच्यासाठी ही श्रेणी उपयुक्त आहे.

  2. किशोर श्रेणी – ज्यांचा व्यवसाय काही प्रमाणात स्थिर आहे, पण वाढीसाठी भांडवलाची गरज आहे, त्यांनी या श्रेणीतून ५ लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळवू शकतात. ही श्रेणी व्यापार वाढवण्याच्या प्रक्रियेत असलेल्या उद्योजकांसाठी आहे.

  3. तरुण श्रेणी – ही श्रेणी प्रगतीशील व्यवसायासाठी आहे. यामध्ये १० लाख रुपयांपर्यंतचं कर्ज दिलं जातं. मध्यम स्वरूपाचा व्यवसाय किंवा उत्पादन क्षमता वाढवण्याच्या उद्देशाने हा निधी उपयोगी ठरतो.

  4. तरुणप्लस श्रेणी – ही नव्याने सुरू झालेली श्रेणी असून, यामध्ये अर्जदाराला २० लाख रुपयांपर्यंतचं कर्ज मिळू शकतं. ज्यांना मोठ्या प्रमाणात विस्तार हवा आहे, अधिक मशीन्स, उपकरणं, जागा किंवा मनुष्यबळ भाड्याने घ्यायचं आहे, त्यांनी या श्रेणीतून लाभ घ्यावा.

योजनेचा प्रभाव आणि महिला उद्योजकांची भागीदारी

मुद्रा योजनेचा प्रभाव देशभरात मोठ्या प्रमाणात जाणवतो आहे. सरकारी आकडेवारीनुसार, आतापर्यंत या योजनेअंतर्गत ३२९७१५ कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, योजनेच्या ७० टक्के लाभार्थी महिला आहेत. यावरून लक्षात येतं की ही योजना महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठीही एक प्रभावी साधन बनली आहे. या योजनेमुळे अनेक महिला ग्रामीण व शहरी भागांतून स्वतःचा व्यवसाय सुरू करून आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्या आहेत.

अर्ज करण्याची प्रक्रिया

प्रधानमंत्री मुद्रा योजनेतून कर्ज मिळवण्यासाठी तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. ऑनलाईन अर्जासाठी तुम्हाला मुद्रा योजनेच्या अधिकृत वेबसाईट (www.mudra.org.in) किंवा संबंधित बँकांच्या वेबसाईट्सवर भेट द्यावी लागते. ऑफलाईन पद्धतीसाठी जवळच्या बँकेमध्ये जाऊन मुद्राचा कर्ज अर्ज फॉर्म भरावा लागतो.

फॉर्म भरताना अर्जदाराने आवश्यक कागदपत्रं (जसे की आधार कार्ड, पॅन कार्ड, व्यवसाय योजना, बँक स्टेटमेंट, फोटो, पत्त्याचा पुरावा इ.) जोडावीत. अर्ज सादर केल्यानंतर तुम्हाला एक संदर्भ क्रमांक दिला जातो, ज्याद्वारे तुम्ही पुढची स्थिती पाहू शकता. नंतर बँक किंवा वित्त संस्था तुमच्याशी संपर्क करून आवश्यक पडताळणी करते. सर्व तपासणीनंतर, मंजूर कर्जाची रक्कम तुमच्या खात्यावर थेट जमा केली जाते.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *