भारतात डिजिटल पेमेंट्समध्ये क्रांती घडवून आणणाऱ्या UPI (Unified Payments Interface) प्रणालीने व्यवहार सुलभ, जलद आणि विश्वासार्ह केले आहेत. मात्र, UPIच्या काही नवीन फीचर्स जसे की UPI Lite, Wallet-based UPI payments, UPI Circle आणि Recurring payments अजूनही अपेक्षेप्रमाणे लोकप्रिय होत नाहीयेत. यामागील अनेक तांत्रिक, सामाजिक आणि माहितीच्या अभावाशी संबंधित कारणं लक्षात घेण्यासारखी आहेत.

नव्या फीचर्सची सुरूवात : उद्दिष्ट आणि प्रत्यक्ष परिणाम

NPCI (National Payments Corporation of India) ने डिजिटल व्यवहार अधिक कार्यक्षम करण्यासाठी अनेक नविन फिचर्स सादर केले. UPI Lite चा उद्देश लहान व्यवहार सुलभ करणे, बँक नेटवर्कवरील ताण कमी करणे आणि Wallet-based UPI द्वारे वापरकर्त्यांना बँक स्टेटमेंटवर लहान व्यवहार दाखवणे टाळणे होता. यासोबतच UPI Circle आणि Recurring payments यांचा उद्देश सुरक्षितता आणि सोय यामध्ये वाढ करणे आहे.

तथापि, प्रत्यक्षात हे फीचर्स फारसे वापरले जात नाहीत. उदा. UPI Lite मधून दरमहा फक्त ८ ते ९ कोटी व्यवहार होतात, जे एकूण UPI व्यवहारांच्या केवळ ०.५ ते ०.६ टक्के आहेत. याउलट, एप्रिल २०२५ मध्ये UPI प्लॅटफॉर्मवर १७ अब्ज व्यवहार झाले, ज्यांचे मूल्य सुमारे २३.९ लाख कोटी रुपये होते.

लोकांपर्यंत पोहोचण्यात अडथळे

UPI Lite किंवा Wallet-based UPI साठी अद्याप पुरेशी जनजागृती झालेली नाही. अनेक वापरकर्त्यांना हे फिचर्स काय आहेत, त्यांचा फायदा काय आहे, हे माहीतच नाही. NPCI कडून जाहिरात किंवा डिजिटल साक्षरता मोहिमा कमी झाल्यामुळे सामान्य ग्राहकांमध्ये या फिचर्सविषयी अज्ञान आणि गोंधळ आहे. उदाहरणार्थ, UPI Lite मध्ये अतिरिक्त प्रमाणीकरणाची आवश्यकता नसली तरी अनेकांना त्याचा वापर कसा करायचा हे माहित नाही.

तांत्रिक आणि पायाभूत समस्या

UPI Lite आणि Wallet-based UPI सारखी फीचर्स सध्या केवळ निवडक बँकांमध्ये आणि अ‍ॅप्सवरच उपलब्ध आहेत. यामुळे वापरकर्त्यांना या सेवा सहज उपलब्ध होत नाहीत. बँक अ‍ॅप्समध्ये यांची अंमलबजावणी अद्याप अपुरी आहे. तसेच, व्यवहारांबाबत पारदर्शकता आणि ग्राहकांच्या विश्वासाचाही अभाव दिसतो, ज्यामुळे नवीन फिचर्सचा स्वीकार होण्यात अडथळा येतो.

UPI Circle आणि Secondary Users : सुरुवात चांगली पण विस्तार अपुरा

UPI Circle हे फिचर सेकंडरी युजर्स – जसे की लहान मूलं, घरातील वडीलधारी मंडळी – यांना माफक मर्यादेतील सुरक्षित व्यवहार करण्याची मुभा देतो. हे फिचर विशेषतः फसवणुकीपासून संरक्षण देण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. मात्र, या फिचरबद्दल फारशी जनजागृती नाही आणि यासाठी आवश्यक तांत्रिक संरचना सर्व अ‍ॅप्समध्ये कार्यरत नाही. त्यामुळे याचा वापर अजूनही लाखाच्या घरात आहे.

संभाव्यता असूनही वापर न होण्यामागील कारणं

  1. जनजागृतीचा अभाव – बहुतांश युजर्सना UPI Lite, Wallet UPI किंवा Circle फिचर्सची माहितीच नाही.

  2. मर्यादित अ‍ॅप आणि बँक सपोर्ट – ही फिचर्स केवळ काही निवडक बँकांमध्ये किंवा UPI अ‍ॅप्समध्ये कार्यरत आहेत.

  3. सोप्या पर्यायांची उपलब्धता – वापरकर्ते आजही पारंपरिक UPI व्यवहार (QR स्कॅन करून थेट बँकेतून पैसे पाठवणे) अधिक सोपा मानतात.

  4. विश्वासाचा अभाव – नव्या फीचर्सच्या सुरक्षेबाबत शंका असल्यामुळे लोक नवीन पर्याय स्वीकारण्यास साशंक आहेत.

  5. तांत्रिक अडथळे – व्यवहारांमध्ये अडथळे, फेल ट्रान्झॅक्शन्स किंवा अपुरी ग्राहक सेवा यामुळे नकारात्मक अनुभव होतो.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *