वर्ल्ड गोल्ड कौन्सिल (WGC) च्या अहवालानुसार भारतामध्ये २०२५ पर्यंत सोन्याची एकूण मागणी ७०० ते ८०० टनांच्या दरम्यान राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. जागतिक स्तरावर सोन्याच्या किमतींत मोठी वाढ असून, भारतीय बाजारपेठेतही त्याचा मोठा परिणाम दिसून येत आहे. वाढती महागाई, आंतरराष्ट्रीय राजकीय-आर्थिक घडामोडी आणि गुंतवणुकीचा विश्वास या सर्व घटकांनी भारतीयांच्या सोन्याच्या खरेदी पद्धतीत लक्षणीय बदल घडवून आणले आहेत.
जानेवारी-मार्च २०२५: मागणी कमी, पण किंमत वाढली
२०२५ च्या पहिल्या तिमाहीत भारतातील सोन्याची मागणी १५ टक्क्यांनी घसरून ११८.१ टनांवर आली आहे. मात्र, याच काळात सोन्याचे मूल्य २२ टक्क्यांनी वाढून ९४,०३० कोटी रुपये झाले. याचा अर्थ असा की, लोकांनी मागील वर्षाच्या तुलनेत प्रमाणात कमी सोने खरेदी केले, परंतु वाढलेल्या किमतीमुळे एकूण खर्च मोठ्या प्रमाणात वाढला.
विशेष म्हणजे, दागिन्यांची खरेदी ७१.४ टनांवर पोहोचली असून त्यात २५ टक्क्यांची घट झाली आहे. याउलट, सोन्याच्या गुंतवणूक मागणीत मात्र ७ टक्क्यांची वाढ झाल्याचे स्पष्ट होते, कारण ती ४६.७ टनांवर पोहोचली.
सोन्याच्या किंमतीत मोठी झेप
२०२५च्या सुरुवातीपासून सोन्याच्या किंमतीत २५ टक्क्यांपर्यंत वाढ झाली असून, आजच्या घडीला सोन्याचा भाव प्रतितोळा जवळपास १ लाख रुपयांवर पोहोचला आहे. २०२४ च्या पहिल्या तिमाहीत हा दर ५५,२४७ रुपये प्रति तोळा होता, जो आता वाढून ७९,६३३ रुपये प्रति १० ग्रॅम (सुमारे ९३,००० रुपये प्रति तोळा) झाला आहे. ही किंमतीतील वाढ ग्राहकांच्या खरेदी क्षमतेवर थेट परिणाम करत आहे.
ग्राहकांचा बदलता दृष्टिकोन आणि खरेदीचा उत्साह
WGC इंडियाचे सीईओ सचिन जैन यांनी नमूद केले की, सोन्याच्या किंमती वाढल्याने लोकांच्या खरेदीवर थोडा ताण येणार असला, तरीही अक्षयतृतीया, लग्नसराई आणि सणासुदीच्या खरेदीसाठी उत्साह कमी होणार नाही. विशेषतः भारतात सोने हे केवळ दागिना नसून एक सांस्कृतिक व गुंतवणूक पर्याय असल्यामुळे, किंमती वाढल्या तरी त्याचा दीर्घकालीन मागणीवर फारसा परिणाम होणार नाही.
सोन्याच्या आयातीत वाढ, पण पुनर्वापरात घट
जानेवारी ते मार्च २०२५ या कालावधीत भारताने १६७.४ टन सोनं आयात केलं असून यात ८ टक्क्यांची वाढ झाली आहे. याउलट, सोन्याचा पुनर्वापर ३२ टक्क्यांनी घटून २६ टनांवर आला आहे. ही घट ग्राहकांच्या नव्या सोन्यावरील कलाची आणि भावी गुंतवणुकीवरील विश्वासाची संकेत देते.