नॅशनल पेमेंटकॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI) १ ऑगस्टपासून यूपीआय वापरासाठी नवीन नियम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार, फोनपे, गुगल पे, पेटीएमसारख्या लोकप्रिय यूपीआय अॅप्सवर काही महत्त्वाच्या फीचर्सवर दिवसाला मर्यादा लागू होणार आहे. विशेषतः बॅलन्स तपासणे, ऑटोपेमेंटची परवानगी देणे आणि ट्रान्झॅक्शन स्टेटस पाहणे यांसारख्या सेवेवर ही मर्यादा घालण्यात येणार आहे. यामुळे यूपीआय वापरण्याची पद्धत लक्षणीय बदलेल आणि अॅप्सच्या वापरावर नियंत्रण वाढेल.
नेटवर्कवरील भार कमी करण्याचा प्रयत्न
NPCI च्या नव्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, यूपीआय नेटवर्कवर होणारा भार कमी करण्यासाठी बँका आणि पेमेंट अॅप्सना API विनंत्यांच्या वेग आणि संख्येवर मर्यादा घालावी लागणार आहे. यामध्ये ग्राहक तसेच सिस्टम या दोघांनी केलेल्या API विनंत्यांचा समावेश आहे. जर बँका किंवा अॅप्स यांनी या नियमांचं उल्लंघन केलं तर NPCI त्यांच्यावर कडक कारवाई करू शकते. यामुळे यूपीआय नेटवर्क अधिक स्थिर आणि विश्वासार्ह होण्याची शक्यता आहे.
बॅलन्स तपासण्यावर दिवसाला ५० वेळांची मर्यादा
जर तुम्ही यूपीआय अॅपवर वारंवार बॅलन्स तपासण्याची सवय ठेवत असाल तर १ ऑगस्टपासून यावरही मर्यादा लागू होणार आहे. आता तुम्ही दिवसातून जास्तीत जास्त ५० वेळा बॅलन्स पाहू शकाल. Ezeepay चे मुख्य कार्यकारी अधिकारी मुशर्रफ हुसेन यांनी सांगितले की, या मर्यादेमुळे व्यापाऱ्यांना काही अडचणी येऊ शकतात, पण हा नियम यूपीआय नेटवर्कचा भार कमी करण्यासाठी आवश्यक आहे. तसेच, पीक टाईममध्ये (सकाळी १० ते दुपारी १ आणि सायंकाळी ५ ते रात्री ९:३०) बॅलन्स तपासण्यावर बंदी लागू शकते. या वेळेत बँका प्रत्येक व्यवहारानंतर ग्राहकांना शिल्लक माहिती द्यावी लागेल, ज्यामुळे वारंवार बॅलन्स पाहण्याची गरज कमी होईल.
ऑटो पेमेंटवर वेळेची मर्यादा
UPI ऑटोपेमेंटसाठीही आता वेळेची मर्यादा लागू केली जाईल. नेटफ्लिक्स, SIP किंवा इतर सेवांसाठी यूपीआय ऑटो पेमेंट वापरणार्या ग्राहकांसाठी ऑथरायझेशन आणि डेबिट प्रक्रिया फक्त नॉन-पीक वेळात (दुपारी १ ते संध्याकाळी ५ आणि रात्री ९:३० नंतर) होईल. पीक टाईममध्ये (सकाळी १० ते दुपारी १ आणि सायंकाळी ५ ते रात्री ९:३०) ऑटोपेमेंटवर निर्बंध राहतील. यामुळे यूपीआयच्या प्रणालीवर होणारा ताण कमी होईल आणि सेवा अधिक स्थिर राहील.
यूपीआय सेवांमध्ये सुधारणा आणि भविष्यातील अपेक्षा
यूपीआय सेवेच्या वारंवार क्रॅश होण्याच्या घटना पाहता NPCI ने हे कडक नियम लागू केले आहेत, जेणेकरून पायाभूत सुविधा सुधारण्यास आणि नेटवर्क अधिक विश्वासार्ह बनवण्यास मदत होईल. गेल्या काळात काही लोकांनी यूपीआय वापरावर शुल्क घालण्याचीही मागणी केली होती, परंतु आता त्या ऐवजी पीक टाईममध्ये वापरावर मर्यादा घालण्यावर भर देण्यात आला आहे. या बदलांमुळे यूजर्सना सुरुवातीला काही अडचणी वाटू शकतात, पण दीर्घकालीन दृष्टीने यूपीआयचा अनुभव अधिक सुरक्षित आणि स्थिर होईल, अशी अपेक्षा आहे.