मेहुल चोक्सी केस अपडेट: २०१८ पासून भारतातून फरार असलेला हिरे व्यापारी मेहुल चोक्सी याने लंडनमधील एका न्यायालयात केलेल्या दाव्यामुळे पुन्हा एकदा राजकीय आणि कायदेशीर वादाला तोंड फुटलं आहे. चोक्सीने कोर्टात सांगितले की, २०२१ मध्ये भारतीय एजंट्सनी त्याचं अपहरण केलं होतं आणि त्याच्याकडून जबरदस्तीने कबुली मिळवण्याचा प्रयत्न झाला.
अपहरणाचा आरोप आणि गंभीर गुन्ह्यांची पार्श्वभूमी
चोक्सीने लंडन न्यायालयात दाखल केलेल्या खटल्यात म्हटले आहे की, भारत सरकार व पाच अन्य व्यक्तींनी त्याच्या अपहरणात सहभाग घेतला होता. यामध्ये त्याच्यावर राजकीय विरोधकांशी संगनमत केल्याचा खोटा कबुलीजबाब जबरदस्तीने लिहवून घेतल्याचाही आरोप आहे.
चोक्सीवर भारतीय बँकांना सुमारे दीड अब्ज डॉलर्सचा (अंदाजे ₹१२,००० कोटींचा) गंडा घालण्याचे आरोप आहेत. तो गीतांजली जेम्स या कंपनीचा चेअरमन असून, नीरव मोदीचा काका आहे. २०१८ मध्ये हे दोघंही देशातून फरार झाले होते.
काय घडलं होतं २०२१ मध्ये?
चोक्सीच्या वकिलांप्रमाणे, मे २०२१ मध्ये अँटिग्वामधील त्याच्या घराजवळून त्याचं अपहरण करण्यात आलं. त्यानंतर त्याला जबरदस्तीने बोटीवर नेण्यात आलं. कोर्टात वकील एडवर्ड फिट्झगेराल्ड यांनी सांगितले की, चोक्सीवर त्या वेळी हल्ला करण्यात आला, चेहऱ्यावर टेसर गनने वार, डोळे बांधणं, गळा दाबणं, आणि व्हीलचेअरला बांधणं यांसारख्या कृती करण्यात आल्या. चोक्सी बेशुद्ध झाला आणि जेव्हा शुद्धीवर आला तेव्हा तो एका नौकेवर होता. त्याला पुन्हा धमकावण्यात आलं की, जर त्याने भारतात परत जाण्यास नकार दिला तर त्याला आणि त्याच्या कुटुंबाला ठार मारलं जाईल.
भारत सरकारचा स्पष्ट विरोध
भारत सरकारने चोक्सीचे सर्व आरोप फेटाळून लावत त्याला खोटे आणि प्रत्यार्पण टाळण्यासाठी रचलेला कट असल्याचे म्हटले आहे. सरकारी वकिलांनी न्यायालयात सांगितले की, हे कथित अपहरण ब्रिटनमध्ये घडलेले नाही आणि त्यामुळे या प्रकरणावर यूकेच्या कोर्टाने सुनावणी करू नये.
याशिवाय, चोक्सीने या खटल्यामध्ये सुमारे २.५ लाख पौंडांचे (₹३.३९ लाख डॉलर) नुकसान भरपाईचे दावेही केले आहेत.
नीरव मोदी आणि चोक्सी – भारतातील मोठ्या फसवणूक प्रकरणातील प्रमुख आरोपी
चोक्सी आणि त्याचा पुतण्या नीरव मोदी हे भारतीय स्टेट बँकिंग इतिहासातील सर्वात मोठ्या आर्थिक घोटाळ्यांतील प्रमुख आरोपी आहेत. पंजाब नॅशनल बँकेच्या फसवणूक प्रकरणात या दोघांनी परकीय संस्थांसोबत मिळून कोट्यवधी रुपयांचे कर्ज घेतले आणि परतफेड न करता परदेशात पलायन केले.
नीरव मोदी सध्या यूकेच्या तुरुंगात बंद आहे आणि त्याचे भारतात प्रत्यार्पण निश्चित झालं आहे. दुसरीकडे, चोक्सीने अँटिग्वामधील नागरिकत्व घेतलं होतं आणि त्याने भारतात परत येण्यास टाळाटाळ केली होती.
सद्यस्थिती काय आहे?
सध्या चोक्सी बेल्जियममध्ये अटकेत आहे. भारत सरकारने त्याचे प्रत्यार्पण मागितले आहे. मात्र, चोक्सीने प्रत्यार्पण रोखण्यासाठी लंडन कोर्टात खटला दाखल करून आंतरराष्ट्रीय राजकीय हस्तक्षेप आणि जबरदस्तीच्या कारवायांचा आरोप केला आहे.
भारत सरकारने या सर्व आरोपांना स्पष्ट शब्दांत फेटाळले असून, त्याने फसवणुकीच्या गंभीर आरोपांपासून बचाव करण्यासाठीच या गोष्टी घडवून आणल्या असल्याचा ठाम दावा केला आहे.