प्राप्तीकर रिटर्न (ITR) दाखल करण्याच्या प्रक्रिया अनेकांसाठी तणावपूर्ण असते. प्रत्येक आर्थिक वर्षाच्या अखेरीस म्हणजेच जुलै महिना उजाडल्यावर करदात्यांमध्ये एक घाई गडबड सुरु होते. पण या घाईगडबडीत जर दोन महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेतल्या नाहीत, तर तुमचा कर परतावा (Refund) अडकू शकतो, किंवा अजून वाईट म्हणजे प्राप्तीकर विभागाकडून नोटीस येऊ शकते. या दोन गोष्टी म्हणजे Form 26AS आणि Annual Information Statement (AIS). चला पाहूया या दोन दस्तऐवजांचे महत्त्व आणि त्यांची खातरजमा कशी करावी.

फॉर्म 26AS – कर कापलेला की जमा झाला? याची खात्री करणारा दस्तऐवज

Form 26AS हा एक टॅक्स क्रेडिट स्टेटमेंट आहे, जो प्राप्तीकर विभागाच्या वेबसाईटवर तुमच्या पॅन नंबरच्या आधारे उपलब्ध असतो. यात खालील गोष्टींचा तपशील असतो:

  • तुमच्या पगारातून कापलेला TDS

  • बँकेकडून मिळालेल्या व्याजावर कापलेला TDS

  • मालमत्ता खरेदी किंवा विक्रीच्या वेळी कापलेला TDS

  • म्युच्युअल फंड, लाभांश, इतर गुंतवणुकींवरील TDS

हा फॉर्म म्हणजे सरकारकडे जमा झालेल्या कराची नोंद. म्हणजे, तुमच्या उत्पन्नावर कापलेला TDS प्रत्यक्षात सरकारकडे जमा झाला आहे का, हे इथून समजते. जर एखादी TDS रक्कम कापली गेली पण 26AS मध्ये ती दिसत नसेल, तर ती रक्कम तुमच्या कर रिफंडमध्ये धरली जाणार नाही. त्यामुळे, तुम्ही TDS वर आधारित रिफंडची अपेक्षा करत असाल, तर ही माहिती योग्य आणि पूर्ण आहे की नाही हे आधीच तपासणे अत्यंत आवश्यक आहे.

AIS – तुमच्या आर्थिक आयुष्याचा संपूर्ण आराखडा

AIS म्हणजे Annual Information Statement. हा दस्तऐवज Form 26AS पेक्षा अधिक व्यापक आहे. यामध्ये केवळ TDS ची नव्हे, तर तुमच्या सर्व आर्थिक हालचालींची सविस्तर माहिती असते. उदाहरणार्थ:

  • बँक व्याजावरून मिळालेली रक्कम

  • शेअर्स व म्युच्युअल फंड खरेदी व विक्री

  • लाभांश (Dividends)

  • भाडे उत्पन्न

  • क्रेडिट कार्डवरील मोठे खर्च

  • परदेशी ट्रान्झॅक्शन

AIS हा तुमच्या संपूर्ण आर्थिक आयुष्याचा आरसा आहे. आणि विशेष म्हणजे, हे सर्व डेटा प्राप्तीकर विभाग स्वतः गोळा करतो – बँक, म्युच्युअल फंड, डीमॅट खाते, क्रेडिट कार्ड कंपन्यांकडून. त्यामुळे, जर तुमच्या ITR मध्ये एखादी गोष्ट तुम्ही नमूद केली नसेल, पण ती AIS मध्ये आहे, तर त्यावरून मिळणाऱ्या नोटीसेची शक्यता प्रचंड वाढते.

माहितीतील विसंगती म्हणजे संकटाची घंटा

प्राप्तीकर विभाग आता डेटा विश्लेषणाच्या अत्याधुनिक प्रणाली वापरतो. त्यामुळे, तुमच्या ITR आणि AIS/26AS यामधील कुठलीही विसंगती लगेच लक्षात येते. उदाहरणार्थ, जर AIS मध्ये दाखवलेले तुम्ही 50,000 रुपये व्याज मिळवले, पण ते तुमच्या ITR मध्ये नमूद नसेल, तर विभाग लगेच तुम्हाला नोटीस पाठवू शकतो. यामुळे रिफंडही रोखून धरले जाते, आणि कधी कधी अतिरिक्त कर भरण्याची वेळही येते.

टाळा चूक, करा ‘फिडबॅक’

AIS मध्ये काही चुकीची माहिती असेल, जसे की एखादी रक्कम जी प्रत्यक्षात तुम्हाला मिळालेलीच नाही, तर ती तात्काळ प्राप्तीकर विभागाच्या पोर्टलवर ‘Feedback’ विभागात दर्शवावी. अशा चुका सुधारल्या जातात आणि त्यानंतरच तुमचा अंतिम ITR दाखल केला पाहिजे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *