कधी गुंतवणूकदारांना भरघोस नफा देणारी, मल्टीबॅगर ठरलेली जेनसोल इंजिनिअरिंग लिमिटेड ही कंपनी सध्या आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे. २०२३ मध्ये या कंपनीच्या शेअर्सने २३९० रुपयांचा उच्चांक गाठला होता. मात्र, अवघ्या काही महिन्यांत या शेअर्सने भयानक घसरण अनुभवली असून, सध्या तो केवळ ५९ रुपयांवर पोहोचला आहे. ही घसरण जवळपास ९५ टक्क्यांहून अधिक आहे. कंपनीचे शेअर्स २४ जून २०२४ रोजी १,१२५.७५ रुपयांवर होते, ते आता ५२.८४ रुपयांपर्यंत घसरले आहेत. स्मॉलकॅप श्रेणीत मोडणाऱ्या जेनसोलचे सध्याचे मार्केट कॅप सुमारे २२८ कोटी रुपयांपर्यंत आले आहे.

IREDA कडून दिवाळखोरीची कारवाई

या आर्थिक घसरणीला आणखी गंभीर वळण देणारी घटना म्हणजे, भारतीय अक्षय ऊर्जा विकास संस्था (IREDA) या सरकारी संस्थेने १४ मे २०२५ रोजी जेनसोलविरुद्ध राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणात (NCLT) दिवाळखोरीसंबंधी याचिका दाखल केली आहे. IREDA ने असा आरोप केला आहे की, जेनसोल इंजिनिअरिंगकडून त्यांना ५१० कोटी रुपयांचे कर्ज परत मिळालेले नाही. ही कायदेशीर कारवाई एखाद्या कर्जदाराकडून कंपनीविरुद्ध झालेली पहिली प्रक्रिया आहे. त्यामुळे यामुळे कंपनीच्या आर्थिक स्थैर्यावर मोठा आघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

IREDA ही नवीन आणि अक्षय ऊर्जा मंत्रालयाअंतर्गत काम करणारी संस्था असून, तिच्या मते जेनसोलने वेळेवर कर्जफेड न केल्यामुळे दिवाळखोरीची कारवाई अपरिहार्य ठरली. ही घटना म्हणजे जेनसोलच्या व्यवस्थापनातील ढासळत्या आर्थिक शिस्तीचा गंभीर इशारा मानली जात आहे.

शेअर बाजारात भीतीचं वातावरण

दिवाळखोरीच्या कारवाईमुळे जेनसोल इंजिनिअरिंगच्या शेअर्समध्ये पुन्हा मोठ्या घसरणीची शक्यता वर्तवली जात आहे. मागील काही दिवसांत थोडीफार वाढ दिसली असली, तरी NCLT मध्ये दाखल केलेली याचिका गुंतवणूकदारांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण करणारी आहे. विशेषतः EV भाडे तंत्रज्ञानामध्ये गुंतलेली ही कंपनी भविष्यातील आशावाद निर्माण करणारी मानली जात होती. मात्र, आर्थिक फसवणूक, व्यवस्थापनातील त्रुटी आणि नियामक कारवाई यामुळे तिची विश्वासार्हता धोक्यात आली आहे.

सेबीची कारवाई आणि व्यवस्थापनाचा बदल

या आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर एप्रिल २०२५ मध्ये बाजार नियामक सेबीने जेनसोल इंजिनिअरिंग व कंपनीचे प्रमुख संचालक अनमोल सिंग जग्गी आणि पुनीत सिंग जग्गी यांच्याविरुद्ध तात्पुरता आदेश काढत त्यांना शेअर बाजारातील कोणत्याही व्यवहारांपासून प्रतिबंधित केले होते. या आदेशामुळे कंपनीची बाजारातील प्रतिमा लक्षणीयरीत्या धूमास झाली. या कारवाईनंतर जग्गी बंधूंनी १२ मे २०२५ रोजी संचालकपदाचा राजीनामा दिला. यामुळे कंपनीच्या नेतृत्वात मोठा बदल झाला असला, तरीही या बदलामुळे परिस्थिती सुधारेल अशी कोणतीही ठोस चिन्हे दिसत नाहीत.

गुंतवणूकदारांसाठी इशारा

जेनसोल इंजिनिअरिंगचे उदाहरण हे स्मॉलकॅप कंपन्यांमध्ये गुंतवणूक करताना आवश्यक असलेल्या सावधगिरीचा स्पष्ट इशारा आहे. अतिवेगाने वाढणारे स्टॉक्स, जास्त परतावा देणाऱ्या कंपन्या गुंतवणूकदारांना आकर्षित करतात. मात्र, व्यवस्थापनातील पारदर्शकता, आर्थिक शिस्त आणि नियामक प्रामाणिकता नसल्यास अशा कंपन्या वेगाने कोसळण्याची शक्यता वाढते. जेनसोलचा आजचा आर्थिक आणि कायदेशीर संघर्ष याचे ज्वलंत उदाहरण आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी अशा घटनांकडे डोळसपणे पाहण्याची आणि सतर्क राहण्याची नितांत गरज आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *