गुजरातमधून सैनिकी कारकिर्दीचा प्रवास

कर्नल सोफिया कुरेशी यांचा जन्म १९८१ साली गुजरातमधील वडोदरा येथे झाला. त्या बालपणापासूनच अध्ययनशील व ध्येयवेड्या होत्या. त्यांनी आपलं पदव्युत्तर शिक्षण गुजरातमधून पूर्ण केलं आणि त्यानंतर लष्करात सामील होण्याचा निर्णय घेतला. १९९९ साली त्यांनी चेन्नई येथील Officers Training Academy (OTA) मधून सैनिकी प्रशिक्षण घेतलं. त्याच वर्षी त्यांची लेफ्टनंट पदावर नियुक्ती झाली आणि त्यांनी भारतीय लष्करात प्रवेश केला.

आंतरराष्ट्रीय शांतता मोहिमांतील सहभाग

कर्नल कुरेशी यांचा कारकीर्दीचा प्रवास केवळ भारतापुरता मर्यादित नव्हता. त्यांनी २००६ मध्ये काँगो येथे संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमेत लष्करी निरीक्षक म्हणून काम केलं. ही जबाबदारी अत्यंत प्रतिष्ठेची मानली जाते. याशिवाय, त्यांनी २०१० साली शांतता निर्माण मोहिमांमध्ये देखील सहभाग घेतला, ज्यामुळे त्यांच्या कामाची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली गेली.

ऑपरेशन सिंदूर आणि धाडसी नेतृत्त्व

‘ऑपरेशन सिंदूर’ हे पाकिस्तानमधील दहशतवादी गटांवर थेट केलेलं एक निर्णायक हवाई अभियान होतं. यामध्ये भारतीय सैन्याने जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तय्यबाच्या मुख्यालयांवर निशाणा साधला. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी संयुक्तपणे पाकिस्तानचे खोटे प्रचार आणि द्वेषमूलक विचारसरणी उघड केली. या प्रसंगी कर्नल कुरेशी यांनी केवळ सैनिकी शौर्यच नाही तर सामाजिक सलोख्याचंही भान ठेवून भूमिका मांडली. त्यांनी सांगितलं की, देशात हिंदू-मुस्लिम द्वेष पसरवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर भारतीय लष्कराने केवळ कारवाई केली नाही, तर त्यांच्या मानसिकतेवरही प्रहार केला आहे.

पगार आणि सेवा सुविधा

भारतीय लष्करातील कर्नल पद हे मध्यम दर्जाचं उच्च अधिकारी पद मानलं जातं. या पदावर असलेल्या अधिकाऱ्यांचा मासिक पगार सुमारे ₹१,२१,२०० ते ₹२,१२,४०० दरम्यान असतो. याशिवाय, कर्नल कुरेशी यांना विविध प्रकारचे भत्ते मिळतात. यामध्ये दरमहा ₹१५,५०० चा लष्करी सेवेचा भत्ता (Military Service Pay), फील्ड एरिया भत्ता, घरभाडे भत्ता (HRA), वाहतूक भत्ता (Transport Allowance) आणि गणवेशासाठी ₹२०,००० चा विशेष भत्ता यांचा समावेश आहे. सेवा दरम्यान, त्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना सैन्य रुग्णालयातून मोफत वैद्यकीय सेवा, सैन्य शाळांमध्ये प्रवेशाच्या सवलती आणि अधिकाऱ्यांसाठी निवास सुविधा देखील मिळतात.

महिला सशक्ततेचं प्रतीक

कर्नल सोफिया कुरेशी केवळ एक अधिकारी नाहीत, तर त्या भारतातील महिला सशक्ततेचं मूर्तिमंत उदाहरण आहेत. त्यांनी पुरुषप्रधान सैनिकी व्यवस्थेत स्वतःचं स्थान निर्माण केलं असून अनेक महिलांना लष्करात करिअर करण्यासाठी प्रेरणा दिली आहे. त्यांचा संयम, शौर्य, सामाजिक भान आणि व्यावसायिक कौशल्य हे सर्वच लक्षणीय आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *