म्युच्युअल फंडांमधील SIP म्हणजे Systematic Investment Plan — एक अशा प्रकारची गुंतवणूक योजना आहे जिच्यात गुंतवणूकदार दर महिन्याला ठराविक रक्कम म्युच्युअल फंड स्कीममध्ये गुंतवतो. ही रक्कम फार मोठी असण्याची गरज नाही; अगदी ₹100 पासूनही सुरुवात करता येते. त्यामुळे भारतातील मध्यमवर्गीय व तरुण गुंतवणूकदारांमध्ये ही योजना खूप लोकप्रिय झाली आहे. SIP च्या माध्यमातून फक्त बचतच होत नाही, तर आर्थिक शिस्तदेखील निर्माण होते. या शिस्तबद्ध गुंतवणुकीतून दीर्घकाळात भरीव परतावा मिळतो, विशेषतः निवृत्तीनंतर आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ही योजना उपयोगी ठरते.

दीर्घकालीन गुंतवणुकीत जोखीम कमी, परतावा जास्त

शेअर बाजाराशी निगडीत असल्यामुळे म्युच्युअल फंडांमध्ये थोडी जोखीम असतेच. मात्र, ही जोखीम दीर्घकालीन गुंतवणुकीने बऱ्याच प्रमाणात कमी होते. बाजारातील चढ-उतार काळाच्या ओघात समतोल साधतात आणि सरासरी चांगला परतावा मिळण्याची शक्यता वाढते. SIP चे आणखी एक फायदे म्हणजे “रुपी कॉस्ट अ‍ॅव्हरेजिंग” — म्हणजेच बाजारात भाव कमी असताना अधिक युनिट्स मिळतात आणि बाजारात भाव जास्त असताना कमी युनिट्स मिळतात, परिणामी दीर्घकालीन सरासरी किंमत नियंत्रित राहते. हीच रचना गुंतवणुकीला सुरक्षित आणि परिणामकारक बनवते.

चक्रवाढ व्याज: दीर्घकाळाचे सामर्थ्य

SIP मध्ये मिळणारा सर्वात मोठा लाभ म्हणजे चक्रवाढ व्याजाचा. ही व्याजाची अशी संकल्पना आहे जिच्यामध्ये पूर्वीच्या परताव्यावरही परतावा मिळतो. उदाहरणार्थ, तुम्ही दर महिन्याला ₹5000 SIP मध्ये गुंतवत असाल आणि सरासरी १२% वार्षिक परतावा मानला, तर सुरुवातीच्या काही वर्षांत परतावा कमी वाटेल. पण जसे-जसे वर्ष वाढतील, तशी व्याजाची कमाई झपाट्याने वाढू लागते. चक्रवाढ व्याजाचे हे सामर्थ्य दीर्घकाळात गुंतवणूकदारासाठी प्रचंड संपत्ती निर्माण करू शकते.

दरमहा ₹5000 SIP केल्यास १ कोटी रुपयांचा टप्पा कधी गाठता येईल?

जर तुम्ही दरमहा ₹5000 SIP स्वरूपात गुंतवत असाल आणि तुम्हाला १२% सरासरी वार्षिक परतावा मिळतो, तर १ कोटी रुपयांचा निधी तयार करण्यासाठी तुम्हाला सुमारे २७ वर्षे सातत्याने गुंतवणूक करावी लागेल. या कालावधीत तुम्ही एकूण ₹16,20,000 गुंतवता. मात्र, चक्रवाढ परताव्यामुळे २७ वर्षांनंतर तुम्हाला एकूण ₹1,08,11,565 इतका निधी मिळतो. यामध्ये ₹91,91,565 ही रक्कम नफा (व्याज किंवा परतावा) स्वरूपात मिळते. म्हणजेच तुम्ही गुंतवलेली रक्कम केवळ १६ लाख असून, तुमचा नफा ९२ लाखांपेक्षा अधिक आहे.

बाजारातील चढ-उतार असूनही SIP मध्ये सातत्य का ठेवावे?

गेल्या काही महिन्यांत शेअर बाजारात मोठे चढ-उतार झाले असून, काही गुंतवणूकदारांनी घाबरून आपली गुंतवणूक मागे घेतली. मात्र, ज्यांनी SIP सुरू ठेवली, त्यांनी नफा मिळवण्याची संधी जपली. SIP हे दीर्घकालीन खेळ आहे. अल्पकालीन ताणतणावांपेक्षा दीर्घकालीन उद्दिष्ट महत्त्वाचे आहे. बाजाराचे चक्र काळाच्या ओघात फिरते, पण तुमची सातत्यपूर्ण गुंतवणूकच तुम्हाला मोठ्या संपत्तीच्या टप्प्यावर घेऊन जाते.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *