भारतीय रिझर्व्ह बँकेनं रेपो दरात कपात केल्यानंतर बहुतांश बँकांनी त्यांच्या एफडी (Fixed Deposit) योजनांवरील व्याजदरात कपात केली आहे. मात्र, पोस्ट ऑफिसने मात्र आपल्या ग्राहकांना दिला जाणारा व्याजदर पूर्ववत ठेवला आहे. त्यामुळे बँकांच्या तुलनेत पोस्ट ऑफिसच्या एफडी योजना अधिक फायदेशीर ठरत आहेत. केंद्र सरकारच्या देखरेखीखाली चालणाऱ्या या योजनांमध्ये गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना फिक्स्ड रिटर्न मिळतो आणि गुंतवणूक पूर्णपणे सुरक्षित राहते. यामुळे अनेक गुंतवणूकदार पोस्ट ऑफिसच्या बचत योजनांकडे वळत आहेत.
पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट योजना
पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट (TD) योजना ही बँकांच्या एफडीसारखीच एक सुरक्षित आणि स्थिर परतावा देणारी योजना आहे. या योजनेत ग्राहक ठराविक कालावधीसाठी एक ठराविक रक्कम जमा करतो आणि मॅच्युरिटीच्या वेळी त्याला मूळ रक्कमेसह निश्चित व्याज मिळते. सध्या पोस्ट ऑफिस १ वर्षाच्या टीडीवर ६.९%, २ वर्षांच्या टीडीवर ७%, ३ वर्षांच्या टीडीवर ७.१% आणि ५ वर्षांच्या टीडीवर ७.५% इतके व्याज देत आहे. या योजनेत सर्वसामान्य ग्राहक, ज्येष्ठ नागरिक, महिला वा पुरुष असा भेदभाव केला जात नाही, सर्वांनाच समान व्याजदर मिळतो.
२ वर्षांच्या एफडीवरील परताव्याचा हिशोब
जर तुम्ही तुमच्या पत्नीच्या नावावर पोस्ट ऑफिसमध्ये ₹१,००,००० ची २ वर्षांची टाईम डिपॉझिट केली, तर तुम्हाला सध्या लागू असलेल्या ७% वार्षिक व्याजदरानुसार परतावा मिळतो. ही योजना कंपाउंडिंग पद्धतीने वार्षिक व्याज देत असल्यामुळे दुसऱ्या वर्षी मूळ रकमेवर आणि पहिल्या वर्षी मिळालेल्या व्याजावर एकत्रित व्याज मिळते.
उदाहरणार्थ, जर १ लाख रुपये जमा केले, तर पहिल्या वर्षाअखेर ₹७,००० व्याज मिळते आणि दुसऱ्या वर्षी मूळ रक्कम ₹१,००,००० सोबत या ₹७,००० वर देखील व्याज मिळते. परिणामी, २ वर्षांच्या अखेरीस एकूण रक्कम ₹१,१४,८८८ होते. यात ₹१,००,००० मूळ रक्कम आणि ₹१४,८८८ व्याजरक्कम समाविष्ट आहे.
गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय
पोस्ट ऑफिसच्या एफडी योजना केंद्र सरकारच्या संरक्षणाखाली असल्यामुळे त्या अतिशय सुरक्षित मानल्या जातात. बँका अनेकदा व्याजदरात बदल करतात, मात्र पोस्ट ऑफिसच्या योजना तुलनेने अधिक स्थिर असतात. त्यामुळे ज्यांना रिस्क नको आणि सुरक्षित व स्थिर परतावा हवा आहे, त्यांच्यासाठी पोस्ट ऑफिसची एफडी योजना हे एक उत्तम पर्याय आहे. खास करून गृहिणी किंवा निवृत्त व्यक्तींसाठी या योजना योग्य ठरतात कारण त्यात गुंतवलेला पैसा सुरक्षित असतो आणि निश्चित परतावा मिळतो.