NAV म्हणजे नेट अॅसेट व्हॅल्यू (Net Asset Value). म्युच्युअल फंडामधील प्रत्येक युनिटचा बाजारमूल्याच्या आधारावर ठरलेला दर म्हणजे NAV. म्युच्युअल फंड योजनेत गुंतवणूक करताना हा अत्यंत महत्त्वाचा मापदंड असतो. गुंतवणूकदार ज्या दिवशी एखाद्या म्युच्युअल फंडात पैसे गुंतवतात, त्या दिवशीची NAV दर ठरवून त्यानुसार गुंतवणूकदारांना युनिट्स दिली जातात.
उदाहरणार्थ, जर NAV प्रति युनिट ₹१० असेल आणि गुंतवणूकदाराने ₹५००० गुंतवले असतील, तर त्याला ५०० युनिट्स मिळतील. बाजारात म्युच्युअल फंडातील शेअर्स किंवा अन्य गुंतवणुकीचे मूल्य वाढले की NAV वाढते आणि त्यामुळे गुंतवणूकदाराच्या गुंतवणुकीचे मूल्य देखील वाढते. यामुळे NAV ही म्युच्युअल फंडाच्या कामगिरीचा आरसा मानली जाते.
NAV कशी ठरते?
NAV ठरवण्याची पद्धत ही SEBI (भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ) ने निश्चित केलेल्या नियमांनुसार पार पडते. एकूण मालमत्तेचे मूल्य (assets), मिळकत (जसे डिव्हिडंड, व्याज), आणि बाकी रक्कम यातून देय रक्कम (उदा. शुल्क, खर्च, कर) वजा केली जाते, आणि मिळालेली एकूण शुद्ध किंमत (net value) एकूण युनिट्सच्या संख्येने भागली जाते. त्यातून मिळणारा आकडा म्हणजे प्रतियुनिट NAV.
उदाहरणातून समजून घ्या:
समजा:
-
इक्विटी स्टॉक्सचे बाजारमूल्य: ₹२५० कोटी
-
इतर गुंतवणूक मूल्य: ₹१० कोटी
-
डिव्हिडंड येणे बाकी: ₹५ कोटी
-
शेअर्स विक्रीमधून येणे बाकी: ₹५ कोटी
-
शेअर खरेदीसाठी देणे बाकी: ₹१० कोटी
-
फी/खर्च देणे बाकी: ₹०.५० कोटी
-
एकूण युनिट्स: ३ कोटी
सूत्र:
NAV = (एकूण मालमत्ता + येणे बाकी रक्कम – देणे/खर्च) ÷ युनिट्स
म्हणजे:
NAV = (२५० + १० + ५ + ५) – (१० + ०.५०) ÷ ३
= २७० – १०.५० ÷ ३
= २५९.५० ÷ ३
= ₹८६.५० प्रति युनिट
NAV वाढते कशी?
NAV ही बाजारातील गुंतवणुकीच्या मूल्यावर अवलंबून असते. जर बाजारात तेजी आली, आणि म्युच्युअल फंडाची प्रमुख गुंतवणूक म्हणजे इक्विटी शेअर्सचे भाव वाढले, तर त्यांचा एकूण मूल्य देखील वाढतो. उदा., जर वरील उदाहरणात इक्विटी स्टॉकचे मूल्य ₹३०० कोटी झाले आणि एकूण युनिट्स ३.२० कोटी झाले, तर:
NAV = (३०० + १० + ५ + ५) – (१० + ०.५०) ÷ ३.२०
= ३२० – १०.५० ÷ ३.२०
= ३०९.५० ÷ ३.२०
= ₹९६.७२ प्रति युनिट
यावरून समजते की बाजारात तेजी आल्यामुळे NAV वाढतो, आणि त्यामुळे गुंतवणूकदारांच्या गुंतवणुकीचे मूल्य देखील वाढते.