EPFO Money Alert: पगारदारांनो ईपीएफओच्या EDLI योजनेत मोठा बदल; कोणाला आणि कसा फायदा होणार?
ईपीएफओच्या EDLI योजनेतील मोठे बदल
ईपीएफओ अर्थात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने आपल्या एम्प्लॉइज डिपॉझिट लिंक्ड इन्शुरन्स (ईडीएलआय) योजनेत तीन मोठे बदल केले आहेत. या बदलांचा मुख्य उद्देश सदस्यांच्या कुटुंबीयांना अधिक आर्थिक सुरक्षा प्रदान करणे आणि मृत्यू दाव्यांची प्रक्रिया सोपी करणे हा आहे. योजनेतील या बदलांमुळे विमा संरक्षण वाढेल आणि सदस्यांच्या कुटुंबियांना अधिक सुरक्षा मिळेल.
ईपीएफ सदस्याचा एक वर्षाच्या आत मृत्यू झाला तरी लाभ
नवीन नियमानुसार, ईपीएफ सदस्याचा नोकरीत रुजू झाल्यानंतर एका वर्षाच्या आत मृत्यू झाला तरी कुटुंबाला किमान 50,000 रुपयांचा विमा लाभ मिळेल. पूर्वी अशा परिस्थितीत किमान रक्कम निश्चित नव्हती. हा बदल दरवर्षी कर्तव्य बजावताना मृत्यूमुखी पडणाऱ्या अनेक कुटुंबांना दिलासा देईल.
योगदान थांबले तरीही विमा लाभ
दुसरा महत्त्वाचा बदल म्हणजे सदस्यांच्या ईपीएफ योगदान थांबविल्यानंतर देखील, मृत्यू झाल्यास विमा लाभ मिळेल. जर सदस्याचा शेवटच्या योगदानानंतर 6 महिन्यांच्या आत मृत्यू झाला आणि त्यांचे नाव कंपनीच्या रेकॉर्डमध्ये असेल, तर कुटुंबाला विम्याचा लाभ दिला जाईल. यामुळे अनेक सदस्यांच्या कुटुंबांना सुरक्षा मिळेल.
नोकरी बदलतानाही विमा लाभ
तिसरा बदल नोकरी बदलणाऱ्या सदस्यांसाठी आहे. आता दोन नोकऱ्यांमधील दोन महिन्यांपर्यंतची तफावत ही निरंतर सेवा मानली जाईल. यामुळे जास्तीत जास्त विमा लाभासाठी पात्रता मिळेल. हा बदल दरवर्षी 1,000 हून अधिक कुटुंबांना आर्थिक मदत देऊ शकेल.