प्रत्येक पालकाला हे वाटतं की त्याने ज्या आर्थिक अडचणींना तोंड दिलं, त्या त्याच्या मुलांनी कधीच अनुभवू नयेत. शिक्षणाचा खर्च दिवसेंदिवस वाढत असून, उच्च शिक्षणासाठी लाखो रुपयांची गरज भासू शकते. अशा वेळी केवळ बचत पुरेशी ठरत नाही, तर योजनाबद्ध गुंतवणूक आवश्यक ठरते. आर्थिक स्वातंत्र्य आणि योग्य वयात आपल्या मुलाला चांगल्या संधी मिळाव्यात, यासाठी आजपासूनच नियोजन करणे गरजेचे आहे. या नियोजनासाठी म्युच्युअल फंडातील SIP हा एक शिस्तबद्ध आणि प्रभावी पर्याय ठरू शकतो.
म्युच्युअल फंड SIP म्हणजे काय?
Systematic Investment Plan (SIP) ही म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याची एक सुलभ आणि नियमित पद्धत आहे. या माध्यमातून गुंतवणूकदार दरमहा ठराविक रक्कम फंडात गुंतवतो. या गुंतवणुकीवर चक्रवाढ व्याजाचा प्रभाव मिळत असल्याने दीर्घकाळात मोठा निधी तयार होतो. विशेषतः दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक केल्यास इक्विटी फंड्समध्ये चांगल्या परताव्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे मुलाच्या १० व्या वाढदिवसाच्या वेळी १ कोटी रुपयांचा निधी जमा करायचा असेल, तर SIP हा योग्य मार्ग आहे.
१० वर्षांत १ कोटी रुपये गोळा करण्यासाठी किती SIP लागेल?
जर तुमचं ध्येय मुलाच्या १० व्या वर्षी १ कोटी रुपयांचा निधी तयार करण्याचं असेल, तर यासाठी एक निश्चित गणित वापरावं लागतं. समजा, तुम्ही दरमहा ₹४४,००० SIP करायला सुरुवात केली आणि दरवर्षी ही रक्कम १०% ने वाढवली (Top-Up SIP), तर १० वर्षांनंतर सरासरी १२% वार्षिक परतावा मिळाल्यास तुम्ही अंदाजे ₹९८.५७ लाखांचा फंड उभारू शकता. हा अंदाज असून यामध्ये बाजारातील चढ-उतारांचा विचार केल्यास थोडेफार बदल होऊ शकतात. तरीसुद्धा ही एक शास्त्रशुद्ध, वास्तविक आणि पोहोचण्याजोगी योजना आहे.
Top-Up SIP म्हणजे काय?
Top-Up SIP ही SIP ची अशी सुविधा आहे ज्यामध्ये गुंतवणूकदार दरवर्षी आपल्या मासिक SIP रकमेची विशिष्ट टक्क्यांनी वाढ करू शकतो. यामुळे प्रारंभी कमी रक्कम गुंतवूनही, नंतरच्या वर्षांत गुंतवणूक वाढवून मोठ्या रकमेचा फंड जमा करता येतो. वाढत्या उत्पन्नासोबत SIP वाढवणे हे अधिक व्यावहारिक आणि फायदेशीर ठरते. उदाहरणार्थ, जर एखाद्याचे मासिक उत्पन्न दरवर्षी वाढत असेल, तर SIP मध्ये १०% वाढ करणे सहज शक्य आहे आणि त्यामुळे परतावाही अधिक मिळतो.
योग्य म्युच्युअल फंड निवडताना विचारात घ्यायच्या गोष्टी
मुलाच्या भविष्यासाठी गुंतवणूक करताना योग्य फंड निवडणे अत्यावश्यक आहे. सर्वप्रथम, गुंतवणुकीचा कालावधी आणि उद्दिष्ट स्पष्ट असावं. जर कालावधी दीर्घ असेल (१० वर्षे किंवा त्याहून अधिक), तर इक्विटी फंड निवडणे फायदेशीर ठरते. यामध्ये लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप किंवा मल्टी कॅप फंडांचा विचार करता येतो. लार्ज कॅप फंड्स कमी जोखमीचे पण स्थिर परतावा देणारे असतात, तर मिड आणि स्मॉल कॅप फंड्स जास्त जोखमीचे पण दीर्घकालीन लाभदायक असू शकतात.
तुमची जोखीम घेण्याची क्षमता यानुसार फंड निवडणं गरजेचं आहे. कमी जोखीम असल्यास डेट फंड किंवा हायब्रिड फंड निवडा. जास्त परताव्याच्या अपेक्षेसोबत थोडी अधिक जोखीम घ्यायची तयारी असल्यास इक्विटी फंड निवडणं योग्य ठरेल. याशिवाय, फंडची मागील ३, ५ आणि १० वर्षांतील कामगिरी, त्यातील सातत्य, मार्केट पडल्यावर त्याचा प्रतिसाद याचं विश्लेषण करणं आवश्यक आहे.
खर्चाचं प्रमाण आणि फंड व्यवस्थापनाची गुणवत्ता
फंड निवडताना ‘Expense Ratio’ म्हणजेच खर्चाचं प्रमाण तपासणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. हे प्रमाण जितकं कमी असेल, तितकं तुमच्या परताव्यावर अधिक सकारात्मक परिणाम होतो. दोन समसमान परताव्याचे फंड्स असतील, तर कमी खर्च असलेला फंड अधिक फायदेशीर ठरतो.
यासोबतच, फंड मॅनेजरचा अनुभव आणि पोर्टफोलिओची गुणवत्ता तपासणे देखील गरजेचे आहे. ज्या फंडामध्ये अनुभवी मॅनेजर आणि स्थिर टीम काम करते, त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड सहसा अधिक चांगला असतो. इक्विटी फंडमध्ये कोणत्या कंपन्यांचे शेअर्स आहेत आणि डेट फंडमध्ये कोणत्या प्रकारचे बॉण्ड्स आहेत, याची माहिती घेणं फायद्याचं ठरतं.