आजच्या युगात जीवनशैलीच्या बदलांमुळे, वाढत्या गरजांमुळे आणि शिक्षणाच्या प्रचंड खर्चामुळे प्रत्येक पालकासाठी मुलांचं भविष्य आर्थिक दृष्टिकोनातून सुरक्षित करणं ही एक मोठी जबाबदारी झाली आहे. आज अनेक पालक आपल्या मुलांच्या भविष्याकडे पाहून मेहनतीनं कमावतात, पण कमाई पुरेशी असूनही योग्य नियोजन नसेल, तर ती संपत्ती दीर्घकाळ टिकत नाही. म्हणूनच कमावलेले पैसे योग्य ठिकाणी गुंतवणे हे अत्यंत गरजेचं आहे. जर तुमचं मूल सध्या ३ वर्षांचं किंवा त्याहून लहान असेल आणि तुम्हाला त्याच्या कॉलेज शिक्षणाच्या आधी त्याच्यासाठी मोठा आर्थिक फंड उभारायचा असेल, तर त्यासाठी आताच पावले उचलणे आवश्यक आहे. यासाठी फार मोठे उत्पन्न लागते असं नाही, तर शिस्तबद्ध बचत आणि चक्रवाढ गुंतवणुकीचा वापर केला, तर तुम्ही १५ वर्षांत कोट्यवधींचा फंड तयार करू शकता.
SIP – शिस्तबद्ध गुंतवणुकीचा प्रभावी उपाय
Systematic Investment Plan (SIP) ही एक अशी पद्धत आहे जी दर महिन्याला विशिष्ट रक्कम म्युच्युअल फंडात गुंतवून दीर्घकालीन संपत्ती निर्माण करण्यास मदत करते. SIP चा मुख्य फायदा म्हणजे त्यामध्ये गुंतवणूक वेळोवेळी वाढत राहते आणि चक्रवाढ व्याजामुळे परतावा अधिक चांगला मिळतो. यामध्ये बाजाराची अस्थिरता फारसा परिणाम करत नाही, कारण गुंतवणूक नियमितपणे होते. इतिहास पाहिला, तर अनेक SIP गुंतवणूकदारांनी १२ ते १८ टक्क्यांपर्यंत वार्षिक सरासरी परतावा मिळवला आहे. जर तुम्ही दरमहा ₹16,500 SIP मध्ये गुंतवले आणि ते १५ वर्षे सातत्याने चालू ठेवलं, आणि त्यावर १५% चक्रवाढ परतावा मिळाला, तर शेवटी तुमच्याकडे सुमारे ₹1.01 कोटी रुपये जमा होतील. हे पैसे तुमच्या मुलाच्या उच्च शिक्षणासाठी, करिअरसाठी किंवा उद्योजकतेसाठी मोलाचे ठरू शकतात.
५ कोटी रुपयांचा फंडही शक्य आहे
SIP च्या माध्यमातून फक्त १ कोटी नव्हे तर ५ कोटी रुपयांचाही फंड उभारणे शक्य आहे – फक्त गुंतवणुकीची रक्कम आणि वाढीचा दर बदलावा लागतो. फंड्स इंडिया रिसर्चच्या अंदाजानुसार, जर तुम्ही दरमहा ₹30,000 गुंतवले आणि दरवर्षी या रकमेची वाढ १०% दराने केली, तर तुम्हाला सरासरी १२% परतावा मिळाल्यास सुमारे १९ वर्षांत तुम्ही ५ कोटी रुपयांचा फंड उभारू शकता. विशेष म्हणजे या प्रवासातील पहिल्या ५० लाख रुपयांचा टप्पा तुम्ही फक्त ७ वर्षांमध्ये गाठू शकता. यामागे कारण आहे चक्रवाढीचा परिणाम – जितका कालावधी वाढतो, तितका परतावा वेगाने वाढतो.
कमी वेळात १ कोटीचा टप्पाही गाठता येतो
काही पालकांना कमी कालावधीत – म्हणजे १० वर्षांत – मोठा निधी उभारायचा असेल, तर त्यासाठी SIP रक्कम आणि तिची वाढ आणखी आक्रमक करावी लागते. उदाहरणार्थ, जर तुम्ही मासिक ₹30,000 गुंतवले आणि त्यात दरवर्षी १०% वाढ केली, तसेच सरासरी १२% परतावा मिळवला, तर १० वर्षांत तुम्ही सुमारे १ कोटी रुपयांचा फंड तयार करू शकता. यानंतर पुढील टप्पे अधिक वेगाने पार होतील – दुसरे ५० लाख फक्त ४ वर्षांत, आणि तिसरे ५० लाख फक्त २ वर्षांत जमा होऊ शकतात. या आकड्यांवरून हे स्पष्ट होते की, शिस्तबद्ध गुंतवणूक आणि संयम या दोन गोष्टी अंगीकारल्या, तर अगदी सामान्य उत्पन्न असलेल्या व्यक्तीनेही आपल्या मुलाचं भविष्य सुरक्षित आणि सशक्त करू शकतो.