जगातील सर्वात मोठे गुंतवणूकदार वॉरेन बफे यांची प्रत्येक हालचाल जागतिक गुंतवणूकदारांचे लक्ष वेधून घेते. त्यांच्या अलीकडच्या हालचालींवरून मोठ्या आर्थिक घडामोडींची चाहूल लागत आहे. त्यांनी त्यांच्या गुंतवणूक समूह बर्कशायर हॅथवे अंतर्गत मोठ्या प्रमाणावर होल्डिंग्ज विकून तब्बल २८ लाख कोटी रुपये (३३४ अब्ज डॉलर) रोकड स्वरूपात जमा केली आहे. यामुळे दोन मोठे प्रश्न निर्माण झाले आहेत – मोठी आर्थिक घसरण येणार आहे का? किंवा वॉरेन बफे मोठ्या अधिग्रहणाच्या तयारीत आहेत?
२००८-०९ मंदीआधी बफे यांची अशीच रणनीती
हे काही पहिल्यांदाच घडत नाहीये. २००८-०९ च्या आर्थिक मंदीच्या आधीही वॉरेन बफे यांनी मोठ्या प्रमाणावर रोकड जमा केली होती आणि योग्य वेळी मजबूत कंपन्यांमध्ये गुंतवणूक करून भरघोस नफा कमावला होता. तेव्हा त्यांनी गोल्डमन सॅक्स आणि जनरल इलेक्ट्रिक यांसारख्या बलाढ्य पण आर्थिक अडचणीत असलेल्या कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली होती.
त्याचप्रमाणे, मार्च २००० मध्ये ‘डॉट कॉम बबल’ फुटण्याच्या आधीही वॉरेन बफे यांनी टेक कंपन्यांमध्ये गुंतवणुकीचा निर्णय टाळला होता. बबल फुटल्यानंतर मात्र त्यांनी निवडक टेक कंपन्यांमध्ये हिस्सेदारी वाढवून मोठा फायदा मिळवला. त्यामुळे आजही, बफे यांनी रोकड वाढवली आहे, हे पाहता, बाजारात मोठी घसरण होण्याची शक्यता वाढल्याचे संकेत मिळत आहेत.
२८ लाख कोटींच्या फंडाचा काय होईल उपयोग?
बफे यांच्या बर्कशायर हॅथवे समूहाकडे सध्या इतका मोठा रोकड साठा आहे की, ते कोका-कोलासारख्या ३० मोठ्या कंपन्या खरेदी करू शकतात. परंतु, त्यांनी याबाबत कोणताही स्पष्ट संकेत दिलेला नाही.
वॉरेन बफे यांचे म्हणणे आहे की, अमेरिकन शेअर बाजार सध्या अत्यंत ओव्हरव्हॅल्यूड (अतिशय महाग) आहे. त्यामुळे योग्य किमतीत उत्तम व्यवसाय ओळखणे कठीण झाले आहे. याचा अर्थ त्यांनी सध्या गुंतवणुकीपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे, आणि योग्य संधी मिळताच मोठ्या अधिग्रहणाच्या तयारीत असतील.
मंदी येणार का? की मोठे अधिग्रहण?
तज्ज्ञांच्या मते, वॉरेन बफे यांची ही रणनीती दोन शक्यता दर्शवते:
-
मोठी आर्थिक घसरण येण्याची शक्यता आहे: २०२४ च्या चौथ्या तिमाहीत अमेरिकन शेअर बाजार ओव्हरव्हॅल्यूड असल्याचे बफे यांनी स्पष्ट केले आहे. अशा वेळी त्यांनी मोठ्या प्रमाणावर रोकड जमा करणे हे आर्थिक मंदीची चाहूल दर्शवते.
-
बफे एखाद्या भव्य अधिग्रहणाच्या तयारीत आहेत: बफे यांना योग्य किमतीत मजबूत कंपन्या मिळाल्यास ते मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करण्याची शक्यता आहे. याआधी त्यांनी अनेकदा मंदीचा फायदा घेत गुंतवणूक केली आहे.