ITR भरताना होणाऱ्या चुका आणि त्याचे परिणाम

चुकीचा फॉर्म निवडल्यास अडचणीत येऊ शकतो परतावा
करदात्याने आयकर विवरणपत्र (ITR) भरताना आपली करदाता श्रेणी ओळखून त्यानुसारच ITR फॉर्म निवडणं अत्यावश्यक असतं. केंद्र सरकारने प्रत्येक प्रकारच्या करदात्यासाठी ITR-1 ते ITR-7 अशा वेगवेगळ्या फॉर्म्स ठरवून दिले आहेत. उदाहरणार्थ, वेतनधारकासाठी ITR-1, गुंतवणूक उत्पन्नासाठी ITR-2, व्यवसाय करणाऱ्यांसाठी ITR-3 वापरणे आवश्यक असते. जर करदात्याने चुकीचा फॉर्म भरला, तर त्याचा परिणाम थेट कर परताव्यावर होतो. परताव्याची प्रक्रिया थांबते, आणि आयकर विभागाकडून रिटर्न ‘अमान्य’ ठरवला जाऊ शकतो.

ITR भरण्याची मुदत आणि त्याचे महत्त्व
यंदा आर्थिक वर्ष 2024-25 साठी ITR भरण्याची अंतिम तारीख ३१ जुलैऐवजी १५ सप्टेंबर 2025 करण्यात आली आहे. ही मुदत पाळणं आवश्यक आहे, कारण विलंबित रिटर्न भरल्यास दंड आकारला जाऊ शकतो. उशिरा भरलेल्या ITR मुळे परताव्याची प्रक्रिया उशीराने होते किंवा काही वेळा परतावा मिळवणं कठीण देखील होऊ शकतं. त्यामुळे सर्व करदात्यांनी वेळेत व योग्य फॉर्मद्वारे रिटर्न भरावा.

उत्पन्नाचे सर्व स्रोत ITR मध्ये नमूद करणे आवश्यक
अनेकदा करदाते फक्त मुख्य उत्पन्नाचा स्रोत दाखवतात आणि बँकेतील व्याज, घरभाडे, भांडवली नफा (Capital Gains), शेअर्समधील लाभ, डिव्हिडेंड्स वगैरे उत्पन्न लपवतात. हे अत्यंत धोकादायक आहे. कारण उत्पन्न लपवलं असल्यास आयकर विभाग ५० टक्क्यांपासून २०० टक्क्यांपर्यंत दंड आकारू शकतो. त्यामुळे उत्पन्नाचे सर्व स्रोत, अगदी छोटे असले तरी, विवरणपत्रात नमूद करणं बंधनकारक आहे.

PAN कार्डशी संबंधित माहिती अचूक असणं गरजेचं
ITR फॉर्म भरताना दिलेली माहिती – जसे की नाव, जन्मतारीख, पत्ता, फोन क्रमांक इ. – पॅन कार्डावरील माहितीसह मेळ खात असली पाहिजे. जर या माहितीमध्ये तफावत आढळली, तर आयकर विभाग तुमचा रिटर्न प्रक्रिया करण्यास विलंब करू शकतो. त्याचबरोबर, पॅन आणि आधार लिंक केले नसल्यासही पॅन निष्क्रिय होऊ शकतो, ज्याचा परिणाम ITR स्वीकारण्यात होतो.

मोठ्या खर्चाचा ताळमेळ उत्पन्नाशी आवश्यक
जर एखाद्या करदात्याने मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली, किंवा उच्च-मूल्य खरेदी (जसे की गाडी, फ्लॅट) केली, पण त्याच्या ITR मध्ये उत्पन्न कमी दाखवले, तर आयकर विभागाला शंका येते. अशा वेळी करदात्याला नोटीस मिळू शकते आणि तपासणीस सामोरे जावे लागते. त्यामुळे कोणताही मोठा खर्च करताना त्याचा ताळमेळ रीतसर दाखवलेलं उत्पन्नाशी असावा.

नोकरी बदलल्यास फॉर्म १६ योग्यप्रकारे सादर करा
जर एखाद्या आर्थिक वर्षात तुम्ही दोन वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये काम केले असेल, तर दोन्ही कंपन्यांकडून मिळालेला फॉर्म १६ एकत्र करूनच ITR भरावा. अनेक वेळा कर्मचारी नवीन कंपनीकडे फक्त त्यांच्या TDS चा विचार करून रिटर्न भरतात, पण यामुळे जुन्या कंपनीकडून मिळालेलं उत्पन्न वगळलं जातं आणि रिटर्न चुकीचा भरला जातो. त्यामुळे TDS चा अचूक हिशोब राखण्यासाठी फॉर्म १६ नीट एकत्रित सादर करणं आवश्यक आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *