दुबईतील बुर्ज खलिफा ही केवळ जगातील सर्वात उंच इमारतच नाही, तर ती समृद्धी, वैभव आणि महत्त्वाकांक्षेचे प्रतिक मानली जाते. जगभरातील अनेक लोकांसाठी ही इमारत पाहणं हीच एक स्वप्नपूर्ती असते. मात्र, एक भारतीय उद्योजक – जॉर्ज व्ही नेरेपरांबिल – यांच्यासाठी ही केवळ एक वास्तू नसून, त्यांच्या यशाचा अत्युच्च टप्पा आहे. जॉर्ज यांनी या आयकॉनिक इमारतीत तब्बल २२ आलिशान अपार्टमेंट्स खरेदी केली असून, ते बुर्ज खलिफातील सर्वात मोठे अपार्टमेंट मालक आहेत.
सामान्य कुटुंबातून आलेल्या जॉर्ज यांचा संघर्षमय प्रवास
जॉर्ज यांचा जन्म केरळमधील एका सर्वसामान्य कुटुंबात झाला. त्यांचं बालपण गरिबीने ग्रासलेलं होतं. वयाच्या अवघ्या ११ व्या वर्षी त्यांनी काम करण्यास सुरुवात केली. वडिलांना त्यांनी कॅस क्रॉपच्या व्यापारात आणि वाहतुकीत मदत केली. त्याच काळात त्यांनी व्यवसायिक बुद्धिमत्तेचा परिचय दिला – उरलेल्या कापसाच्या बियाण्यांपासून गोंद बनवण्याचा व्यवसाय सुरू केला. त्याचप्रमाणे, वेस्ट सेलिंगच्या व्यवसायातूनही चांगलं उत्पन्न मिळवलं आणि त्यांनी घराच्या आर्थिक गरजा भागवण्यात मोठा वाटा उचलला.
शारजाहमध्ये संधी शोधणारा तरुण
१९७६ मध्ये, जॉर्ज शारजाहला गेले, तेव्हा मध्यपूर्वेतील अर्थव्यवस्था तेजीत होती. तिथे त्यांनी उष्णतेचा अनुभव घेतल्यानंतर एअर कंडिशनिंग क्षेत्रात संधी शोधली. त्यांनी स्वतःची कंपनी सुरू केली आणि या क्षेत्रात नाव कमावलं. त्यांची मेहनत, दूरदृष्टी आणि जिद्द यामुळे ते अल्पावधीतच एक यशस्वी भारतीय उद्योजक म्हणून प्रस्थापित झाले. त्यांच्या कामाचा व्याप हळूहळू आखाती देशांत पसरत गेला.
अपमानाचं रूपांतर प्रेरणेमध्ये
एकदा जॉर्ज यांच्यावर त्यांच्या नातेवाईकांनी टोमणा मारला, की ‘तू कधीही बुर्ज खलिफामध्ये पाय ठेवू शकणार नाहीस’. जॉर्ज यांनी हा अपमान आव्हान म्हणून स्वीकारला. काही वर्षांनी त्यांच्या नजरेस वर्तमानपत्रात बुर्ज खलिफातील भाड्याच्या अपार्टमेंटची जाहिरात आली. हीच संधी साधत, २०१० मध्ये त्यांनी एक अपार्टमेंट भाड्यानं घेतलं आणि त्यात राहायला लागले.
स्वप्नपूर्ती ते यशाचं शिखर
बुर्ज खलिफामध्ये राहिल्यानंतर जॉर्ज यांचं स्वप्न अधिक विस्तृत झालं. त्यांनी हळूहळू या इमारतीतील एकापाठोपाठ एक अपार्टमेंट खरेदी करायला सुरुवात केली. आज त्यांच्याकडे बुर्ज खलिफामधील ९०० लक्झरी अपार्टमेंट्सपैकी २२ अपार्टमेंट्स आहेत. इतकी मालमत्ता एका व्यक्तीकडे असणं दुर्मीळ आहे. त्यामुळे ते केवळ एक अपार्टमेंट मालक नाहीत, तर बुर्ज खलिफातील सर्वात मोठे प्रॉपर्टी ओनर बनले आहेत.
आजचे भव्य वैभव
आज, जॉर्ज व्ही नेरेपरांबिल यांची एकूण संपत्ती जवळपास ४,८०० कोटी रुपये आहे. ते दुबईतील एक प्रमुख भारतीय उद्योगपती मानले जातात. त्यांचं राहणीमान देखील त्यांच्या संपत्तीप्रमाणेच आलिशान आहे – त्यांच्या अपार्टमेंटचा मजला, भिंती आणि छत सोन्यानं मढवलेले आहेत. याशिवाय, त्यांना लक्झरी कार्स आणि खासगी विमाने यांची विशेष आवड आहे. त्यांचे जीवन हे दृढ इच्छाशक्ती, मेहनत आणि सकारात्मक दृष्टिकोन यांचे जिवंत उदाहरण आहे.