भारतामध्ये तयार होणाऱ्या स्मार्टफोन आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांची परदेशात मागणी झपाट्याने वाढत आहे. विशेषतः चिनी कंपन्यांनी आता भारतातच उत्पादन करून विविध देशांमध्ये निर्यात करण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये मिडल ईस्ट, आफ्रिका आणि अमेरिकेसारख्या बाजारपेठांचा समावेश आहे. एकेकाळी या देशांमध्ये मुख्यत्वे चीन आणि व्हिएतनाममधून माल पाठवला जात होता. मात्र, भारत सरकारच्या धोरणात्मक प्रयत्नांमुळे आणि देशातील उत्पादन क्षमता वाढल्यामुळे ही स्थिती आता बदलत आहे.
२०२४ मध्ये चिनी कंपन्यांची भारतातून निर्यात सुरू
इकॉनॉमिक टाइम्सच्या अहवालानुसार, ओप्पो मोबाइल इंडिया कंपनीने आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये भारतातून निर्यात करताना तब्बल २७२ कोटी रुपयांचं परकीय चलन मिळवलं आहे. दुसरीकडे, रियलमी मोबाइल टेलिकम्युनिकेशन्स (इंडिया) या कंपनीनेही ११४ कोटी रुपयांची कमाई निर्यातीच्या माध्यमातून केली. या दोन्ही कंपन्यांनी कंपनी रजिस्ट्रारकडे १२ मे रोजी आपली माहिती सादर केली आहे. हायसेन्स ग्रुपसारख्या चिनी इलेक्ट्रॉनिक कंपनीनेही २०२५ च्या सुरुवातीपासून मिडल ईस्ट आणि आफ्रिकेत भारतात तयार झालेल्या वस्तूंची निर्यात सुरू करण्याची योजना आखली आहे.
चिनी कंपन्यांसाठी धोरणात मोठा वळणबिंदू
पूर्वी चिनी कंपन्या भारतातच आपले उत्पादन विकत असत, परंतु २०२० मध्ये भारत-चीन सीमावादानंतर भारत सरकारने या कंपन्यांवर काही निर्बंध लादले. सरकारचा स्पष्ट संदेश होता— चिनी कंपन्यांनी भारतातच उत्पादन करावं आणि भारतीय कंपन्यांसोबत भागीदारी करावी. सरकारने त्यांना उच्चपदांवर भारतीय नागरिकांची नियुक्ती करण्याचेही निर्देश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर, चिनी कंपन्या भारतात तयार माल परदेशी बाजारपेठेत पाठवू लागल्या आहेत.
श्री सिटीतील १०० कोटींचा नवीन प्रकल्प
हायसेन्स कंपनीचा स्थानिक भागीदार ईपॅक ड्युरेबल्सचे व्यवस्थापकीय संचालक अजय सिंघानिया यांनी सांगितले की, आंध्र प्रदेशमधील श्री सिटी येथे १०० कोटी रुपयांचा उत्पादन प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या प्लांटचं डिझाईन आणि कार्यपद्धती हायसेन्सच्या चीनमधील प्रकल्पाच्या धर्तीवरच असेल. त्यामुळे भारतीय उत्पादनाच्या दर्जावर जागतिक कंपन्यांचा विश्वास अधिक बळकट झाला आहे.
लेनोव्हो, मोटोरोला आणि डिक्सन यांची निर्यात धोरणं
लेनोव्हो ग्रुप लवकरच भारतातून सर्व्हर आणि लॅपटॉपची निर्यात सुरू करणार आहे. याच ग्रुपच्या अंतर्गत येणारी मोटोरोला कंपनी आधीच अमेरिकेसाठी स्मार्टफोन निर्यात करत आहे. यासाठी डिक्सन टेक्नॉलॉजीज ही भारतीय कंपनी मोटोरोला फोनचं उत्पादन करते. वाढती निर्यात लक्षात घेता, डिक्सन आपली उत्पादन क्षमता ५० टक्क्यांनी वाढवत आहे. ही कंपनी चिनी ट्रान्सियन होल्डिंग्ससाठीही स्मार्टफोन बनवते, ज्यात इंटेल, टेक्नो आणि इनफिनिक्स हे ब्रँड येतात. सध्या आफ्रिकेत यांची मोठ्या प्रमाणावर निर्यात होत आहे.
भारत सरकारचा पीएलआय योजनेद्वारे आधार
भारत सरकारने काही चिनी कंपन्यांना किंवा त्यांचे भारतीय भागीदारांना उत्पादन आधारित प्रोत्साहन योजना (PLI) अंतर्गत आर्थिक मदत दिली आहे. ही योजना कंपन्यांना उत्पादन वाढीसाठी प्रोत्साहन देते. अनेक चिनी ब्रँड्स या योजनेचा थेट भाग नसले तरी त्यांचे कंत्राटी उत्पादक, जसे की डिक्सन, याचा लाभ घेत आहेत. एका थर्ड पार्टी उत्पादन कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, “भारत सरकार गेल्या काही वर्षांपासून चिनी कंपन्यांना इथून निर्यात करण्याचा मार्ग दाखवत आहे. लवकरच आणखी काही चिनी ब्रँड्सदेखील या पद्धतीने आपली निर्यात सुरू करतील.”