मुंबईच्या लक्झरी रिअल इस्टेट क्षेत्रात नुकत्याच एका ऐतिहासिक व्यवहाराची नोंद झाली आहे. यूएसव्ही प्रायव्हेट लिमिटेडच्या अध्यक्षा लीना गांधी तिवारी यांनी वरळी सी-फेस परिसरात देशातील आतापर्यंतचा सर्वात महागडा डुप्लेक्स अपार्टमेंट विकत घेतला आहे. तब्बल ६३९ कोटी रुपयांमध्ये झालेल्या या व्यवहारामुळे त्या पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आल्या आहेत. यामुळे फक्त मुंबईच नव्हे तर संपूर्ण देशात रिअल इस्टेट क्षेत्रात नवीन आर्थिक उच्चांक गाठला गेला आहे.

‘नमन झाना’ इमारतीतील अल्ट्रा-लक्झरी युनिट्स

लीना गांधी तिवारी यांनी ‘नमन झाना’ या वरळीच्या समुद्रकिनाऱ्यावरील ४० मजली भव्य इमारतीत ३२व्या ते ३५व्या मजल्यापर्यंत दोन अल्ट्रा-लक्झरी युनिट्स खरेदी केल्या आहेत. या युनिट्सचं एकूण क्षेत्रफळ २२,५७२ चौरस फूट असून, एक चौरस फूटाची किंमत २.८३ लाख रुपये आहे. इतक्या महाग दराने निवासी मालमत्ता विकत घेतली गेली आहे, हे भारतात याआधी कधीही घडलेले नाही. या व्यवहाराची नोंदणी याच आठवड्यात झाली असून, त्यासाठी स्टॅम्प ड्युटी आणि GST स्वरूपात सुमारे ६३.९ कोटी रुपये भरले गेले आहेत.

वरळी – श्रीमंत आणि प्रभावशाली व्यक्तींचा हॉटस्पॉट

वरळी परिसर गेल्या काही वर्षांत लक्झरी निवासी मालमत्तेच्या बाबतीत मुंबईतील अग्रगण्य ठिकाणांपैकी एक ठरला आहे. बँद्रा, लोअर परळ आणि नरिमन पॉईंटसारख्या महत्त्वाच्या व्यावसायिक भागांच्या सान्निध्यामुळे वरळीची मागणी वाढली आहे. शिवाय वांद्रे-वर्ली सी लिंकसह येणारे सी लिंक एक्सटेंशन आणि मेट्रो प्रकल्प यामुळे कनेक्टिव्हिटीमध्ये लक्षणीय सुधारणा झाली आहे. उदय कोटक यांच्यासारख्या व्यक्तींनी येथे भव्य इमारती खरेदी केल्यामुळे या परिसराचा स्टेटस सिंबॉलिक महत्व आणखी वाढले आहे.

लीना गांधी तिवारी यांचा पार्श्वभूमी आणि वैभव

लीना गांधी तिवारी या यूएसव्ही लिमिटेड या अग्रगण्य फार्मा कंपनीच्या अध्यक्षा आहेत. ही कंपनी १९६१ मध्ये विठ्ठल गांधी यांनी रेव्हलॉनच्या सहकार्याने सुरू केली होती. त्या विठ्ठल गांधी यांची नात आहेत. यूएसव्ही कंपनी मधुमेह, हृदयरोग, बायोसिमिलर आणि अ‍ॅक्टिव फार्मास्युटिकल इंग्रेडियंट्स (API) क्षेत्रात काम करते. कंपनीचं वार्षिक उत्पन्न सुमारे ५११ दशलक्ष डॉलर्स आहे.

फोर्ब्सच्या आकडेवारीनुसार, २९ मे २०२५ रोजी लीना गांधी तिवारी यांची एकूण संपत्ती ३.९ अब्ज डॉलर्स इतकी होती, ज्यामुळे त्या जगातील ९६४ व्या क्रमांकाच्या श्रीमंत व्यक्ती ठरल्या आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या संपत्तीने फाल्गुनी नायर (नायका) आणि किरण मजुमदार-शॉ (बायोकॉन) यांचाही मागे टाकला आहे.

कुटुंब आणि सामाजिक योगदान

लीना गांधी तिवारी यांचे पती प्रशांत तिवारी हे आयआयटी आणि कॉर्नेल विद्यापीठाचे माजी विद्यार्थी असून, तेही यूएसव्ही कंपनीच्या व्यवस्थापनात महत्त्वाची भूमिका बजावतात. या जोडप्याने केवळ व्यवसायातच नव्हे तर सामाजिक कार्यातही सक्रिय सहभाग घेतला आहे. २०१९ मध्ये त्यांनी विविध सामाजिक उपक्रमांसाठी ३४ कोटी रुपयांचे योगदान दिले होते. त्यामुळे त्यांची प्रतिमा एक यशस्वी उद्योजिका आणि संवेदनशील समाजसेविका अशी उभी राहिली आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *