देशातील आघाडीची माहिती तंत्रज्ञान सेवा प्रदाता कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ने अलीकडेच १२,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून मुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीच्या एकूण ६.१३ लाख कर्मचाऱ्यांपैकी सुमारे २ टक्के कर्मचाऱ्यांवर परिणाम करणारा हा निर्णय, उद्योगात सुरू असलेल्या डिजिटल परिवर्तनाची गंभीर दिशा दाखवतो. विशेषतः मिड आणि सीनिअर पदांवरील कर्मचाऱ्यांना याचा अधिक फटका बसण्याची शक्यता आहे.
AI आणि ऑटोमेशनचं सावट
या घडामोडीमागचं मुख्य कारण कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि ऑटोमेशनचं वाढतं प्रभावीकरण आहे, असं तज्ज्ञांचं मत आहे. जरी TCS ने आपल्या अधिकृत निवेदनात AI ला थेट जबाबदार धरलेलं नसले, तरी ही कपात अशा काळात होत आहे जेव्हा उद्योग AI आधारित कार्यक्षमतेकडे झुकत आहेत.
काउंटरपॉइंट रिसर्चचे रिसर्च डायरेक्टर तरुण पाठक यांनी यावर भाष्य करताना सांगितलं की, “या प्रकारच्या निर्णयांमागे स्थूल आर्थिक दबाव, ग्राहकांच्या बदलत्या अपेक्षा आणि अधिक परिणामकारक कामगिरीवर लक्ष केंद्रित करणारे मॉडेल्स आहेत.” ते पुढे म्हणाले की, “AI आणि ऑटोमेशन हे आता कर्मचारी निर्णयांवर अधिक स्पष्टपणे परिणाम करत आहेत.”
आगामी काळात आणखी कपात संभव
AI प्रणालींचा वापर वाढल्यामुळे आयटी सेवा पुरवठादारांकडून आता कमी कर्मचाऱ्यांमध्ये अधिक कार्यक्षमता साध्य करण्याची अपेक्षा केली जाते. त्यामुळे खर्च कपात आणि कार्यक्षमता वाढवण्याच्या दृष्टीने, अशा निर्णयांची मालिका पुढेही सुरु राहण्याची शक्यता आहे. टेकआर्कचे संस्थापक फैसल कावूसा म्हणतात की, “AI एजंट्स माणसांची जागा घेत आहेत, हे IT क्षेत्रातील संरचनात्मक बदलाचं स्पष्ट लक्षण आहे.”
कौशल्य सुधारणा हीच पुढची वाट
टीमलीज डिजिटलच्या सीईओ नीती शर्मा यांनी सांगितलं की, “AI-आधारित भविष्यासाठी कंपन्या मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांच्या कौशल्यवृद्धीत गुंतवणूक करत आहेत. मात्र, जे कर्मचारी या नव्या पर्यावरणात बसत नाहीत, किंवा बदल स्वीकारू शकत नाहीत, त्यांच्यासाठी ही स्थिती संकटजनक ठरू शकते.”
IT कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता; सोशल मीडियावरही चिंता व्यक्त
TCS च्या या निर्णयानंतर IT क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक कर्मचाऱ्यांमध्ये चिंता वाढल्याचं पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावरही या विषयावर चर्चा सुरु आहे. काही युजर्सनी ही प्रक्रिया “AI मुळे होणाऱ्या अपरिहार्य बदलांची सुरूवात” असे म्हटले, तर काहींनी संभाव्य वेतनकपात आणि वाढती स्पर्धा याबद्दल चिंता व्यक्त केली आहे.