Tata Harrier EV: 2025 मध्ये टाटा मोटर्सने इलेक्ट्रिक एसयूव्हीच्या क्षेत्रात एक महत्त्वाचा टप्पा गाठत हॅरियर ईव्ही बाजारात आणली आहे. ही एसयूव्ही आपल्या अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि आकर्षक डिझाइनसह भारतीय इलेक्ट्रिक वाहन बाजारात दाखल झाली आहे. आज 3 जूनरोजी तिचे लाँचिंग झाले. टाटा हॅरियर ईव्हीची खास वैशिष्ट्ये आणि किंमत पाहुयात-

टाटा हॅरियर ईव्हीची किंमत

टाटा मोटर्सने हॅरियर ईव्हीची किंमत मुंबईतील ऑन-रोड दरानुसार 22.70 लाख रुपयांपासून सुरू असल्याची घोषणा केली आहे. या एसयूव्हीची तीन वेगवेगळी व्हेरियंट्स आहेत – अ‍ॅडव्हेंचर, फियरलेस आणि एम्पॉवर्ड. या सर्व व्हेरियंटसाठी बुकिंग 2 जुलैपासून सुरू होणार आहे, ज्यामुळे ग्राहकांना आपल्याला हवे असलेले मॉडेल निवडण्याची संधी मिळेल.

डिझाइन

हॅरियर ईव्हीचे बाह्य डिझाइन पारंपरिक डिझेल हॅरियरशी जुळते. समोरच्या बाजूला एलईडी हेडलॅम्प्स आणि कनेक्टेड एलईडी डीआरएल मिळतात. वाहनाच्या ईव्ही आवृत्तीमध्ये बंद ग्रिल आणि नवीन डिझाइन केलेला फ्रंट बंपर वापरला आहे. साईड प्रोफाइलमध्ये फारसा फरक नाही, परंतु नवीन अलॉय व्हील डिझाइनसह अधिक आकर्षक बनवले आहे. मागील भागही आयसीई मॉडेलसारखा असून कनेक्टेड एलईडी टेल लॅम्पने सजवलेला आहे.

आतील भागात डॅशबोर्डचे लेआउट पारंपरिक डिझेल मॉडेलप्रमाणेच आहे.मोड सिलेक्टरसाठी नवीन डायल आहे, जो डिझेल हॅरियरमध्ये नाही. याशिवाय, ट्रान्सपरंट मोड, सेल्फ पार्किंग फीचर, 540-डिग्री सराउंड व्ह्यू कॅमेरा, आणि लेव्हल 2 ADAS मध्ये 22 ड्रायव्हर असिस्ट फीचर्स यांचा समावेश आहे. फोन-एज-की, हरमन आणि सॅमसंग निओ QLED द्वारे 14.5 इंचाचा टचस्क्रीन आणि 6 वेगवेगळे टेरेन मोड्स या सुविधा हॅरियर ईव्हीला प्रीमियम बनवतात. डिजिटल IRVM, मेमरी फंक्शनसह फ्रंट पॉवर सीट्स आणि रिव्हर्स पार्क असिस्टसारख्या सुविधा देखील या एसयूव्हीमध्ये आहेत.

हॅरियर ईव्हीमध्ये पॅनोरॅमिक सनरूफ, 10-स्पीकर JBL साउंड सिस्टम, 10.25 इंचाचा डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर यांसारख्या उच्च दर्जाच्या सुविधाही उपलब्ध आहेत, ज्यामुळे प्रवास अधिक आरामदायक आणि आनंददायी होतो.

बॅटरी आणि परफॉर्मन्स

हॅरियर ईव्हीमध्ये दोन बॅटरी पर्याय – 65 kWh आणि 75 kWh उपलब्ध आहेत. यामुळे वाहनाला 627 किलोमीटरपर्यंतचा रेंज मिळतो. लहान बॅटरी पॅकमध्ये 234.7 bhp पॉवरसह सिंगल इलेक्ट्रिक मोटर असते, तर मोठ्या बॅटरीमध्ये सिंगल तसेच ड्युअल मोटर सेटअपसाठी पर्याय दिला आहे. ड्युअल मोटर सेटअपसह 390.5 bhp पॉवर आणि 504 Nm टॉर्क मिळतो. या बॅटरी पॅकला आजीवन वॉरंटीही कंपनीकडून मिळते, जी ग्राहकांसाठी मोठा फायदा आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *