Tata Harrier EV: टाटा मोटर्सने भारतीय बाजारात आपली बहुप्रतिक्षित प्रीमियम इलेक्ट्रिक SUV ‘टाटा हॅरियर EV’ अखेर लाँच केली आहे. आज 3 जून 2025 रोजी या गाडीचे अधिकृत अनावरण झाले असून, तिचा आकर्षक लूक, दमदार बॅटरी, प्रगत तंत्रज्ञान आणि विस्तृत रेंजमुळे ती चर्चेचा विषय बनली आहे.
या नव्या SUV मध्ये कंपनीने 65 kWh आणि 75 kWh क्षमतेच्या दोन वेगवेगळ्या बॅटरी पर्यायांचा समावेश केला आहे. या बॅटरींच्या मदतीने ही गाडी एकूण 627 किलोमीटरची रेंज देऊ शकते. भारतात विकल्या जाणाऱ्या इतर इलेक्ट्रिक SUV गाड्यांच्या तुलनेत ही रेंज खूपच मोठी मानली जात आहे. चार्जिंगच्या बाबतीत, हॅरियर EV मध्ये 120 kW फास्ट चार्जिंगचा पर्याय दिला असून, यामुळे ही गाडी फक्त 25 मिनिटांत 20% ते 80% पर्यंत चार्ज होऊ शकते. विशेष म्हणजे, 15 मिनिटांच्या चार्जिंगमुळे 250 किमीपर्यंत गाडी चालवता येते.
बॅटरी-
ही गाडी ड्युअल मोटर सेटअपसह येते, जी एकत्रितपणे 238 PS पॉवर आणि 504 Nm टॉर्क निर्माण करते. त्यामुळे ही SUV फक्त 6.3 सेकंदात 0 ते 100 किमी/तास वेग गाठू शकते. बॅटरीच्या दीर्घकालीन कार्यक्षमतेसाठी प्रगत थर्मल मॅनेजमेंट सिस्टीम देण्यात आली आहे. तसेच, अल्ट्रा ग्लाइड सस्पेन्शन आणि क्यूडब्ल्यूडी टेक्नॉलॉजीमुळे ही गाडी विविध प्रकारच्या रस्त्यांवर सहजतेने चालते.
हॅरियर EV मध्ये भरपूर प्रगत वैशिष्ट्यांची भर आहे. या SUV मध्ये ड्युअल टोन इंटीरियर, पॅनोरॅमिक सनरूफ, 36.9 सेमी QLED इन्फोटेनमेंट स्क्रीन, ड्युअल झोन क्लायमेट कंट्रोल, अँबियंट लाइटिंग, फोन अॅक्सेससह कीलेस एंट्री, ऑटो पार्किंग सिस्टीम, 540 डिग्री सराउंड व्ह्यू कॅमेरा आणि ई-IRVM सारखी वैशिष्ट्ये दिली गेली आहेत.
6 ड्रायव्हिंग मोड्स आणि बरंच काही-
SUV मध्ये JBL ऑडिओ सिस्टीम देण्यात आली असून, Android Auto आणि Apple CarPlay सपोर्टसह 6 वेगवेगळे ड्रायव्हिंग मोड्स – Normal, Mud, Rock Crawl, Sand, Snow/Grass आणि Custom उपलब्ध आहेत. सुरक्षा क्षेत्रातही हॅरियर EV आघाडीवर असून, ती Level-2 ADAS अंतर्गत 22 सेफ्टी फीचर्ससह येते. यासोबतच OTA अपडेट्स, इन-कार पेमेंट सिस्टीम, V2L, V2V आणि 25 हून अधिक अॅप्ससह आर्केड फीचरही उपलब्ध आहे. टाटा मोटर्स 4 वर्षांसाठी कनेक्टेड कार फीचर्स देत आहे.
बूट स्पेसच्या बाबतीत हॅरियर EV मध्ये 502 लिटरपासून 999 लिटरपर्यंतचा स्पेस आहे. याशिवाय, फ्रंट पॉवर्ड सीट्स, बॉस मोड आणि व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्ससारखी प्रीमियम वैशिष्ट्ये देखील मिळतात.
हॅरियर EV ची एक्स-शोरूम सुरुवातीची किंमत 21.49 लाख रुपये असून ती चार वेगवेगळ्या रंगांमध्ये आणि खास स्टील्थ एडिशनमध्येही उपलब्ध आहे. क्वाड डे कार्यक्रम 13 आणि 14 जून रोजी आयोजित केला जाणार आहे. या गाडीचे अधिकृत बुकिंग 2 जुलै 2025 पासून सुरू होईल.