आजच्या महागाईच्या आणि वाढत्या शैक्षणिक खर्चाच्या युगात पालकांनी आपल्या मुलीच्या भविष्याचा विचार लवकरच करणे आवश्यक आहे. भारत सरकारने खास मुलींसाठी सुरू केलेली सुकन्या समृद्धी योजना (SSY) ही अशी एक योजना आहे जी पूर्णपणे सुरक्षित असून दीर्घकालीन लाभ देते. शिक्षण, विवाह यांसारख्या मोठ्या खर्चासाठी हा एक योजनाबद्ध मार्ग आहे जो कमी गुंतवणुकीतही मोठा निधी तयार करू शकतो.
सुकन्या समृद्धी योजना म्हणजे काय?
सुकन्या समृद्धी योजना ही भारत सरकारची एक लघु बचत योजना आहे, जी फक्त मुलींसाठी उपलब्ध आहे. या योजनेत तुम्ही मुलीच्या नावाने एक खाते उघडू शकता, ज्यामध्ये वार्षिक किमान ₹२५० आणि कमाल ₹१,५०,००० पर्यंत गुंतवणूक करता येते. यावर सरकार दर तीन महिन्यांनी व्याज दर जाहीर करते. सध्या (२०२५) या योजनेचा व्याजदर ८.२% इतका आहे आणि हे व्याज चक्रवाढ पद्धतीने दरवर्षी जमा होते.
या योजनेची एक खास बाब म्हणजे EEE श्रेणीतील करसवलत. याचा अर्थ आहे गुंतवणुकीला, व्याजाला आणि मॅच्युरिटी अमाऊंटला तीनही टप्प्यांवर करमुक्त सवलत. त्यामुळे ही योजना केवळ सुरक्षितच नाही तर कर-बचतीचाही प्रभावी मार्ग ठरते.
खाते कधी आणि कसे उघडावे?
सुकन्या समृद्धी योजनेत मुलगी १० वर्षांची होण्यापूर्वी कधीही खाते उघडता येते. तुम्ही पोस्ट ऑफिस किंवा कोणत्याही अधिकृत सरकारी/खाजगी बँकेत हे खाते उघडू शकता. एका कुटुंबात जास्तीत जास्त दोन मुलींसाठी खाती उघडता येतात. जर जुळे किंवा तिळे मुली जन्माला आल्या असतील, तर तीन खाती उघडण्याचीही मुभा दिली जाते.
गुंतवणूक कालावधी व मॅच्युरिटी कशी ठरते?
खाते उघडल्यापासून १५ वर्षांपर्यंत त्यामध्ये नियमित गुंतवणूक करणे आवश्यक आहे. त्यानंतर ६ वर्षांचा ‘लॉक-इन’ कालावधी असतो, म्हणजे या काळात गुंतवणूक करण्याची गरज नाही, पण योजनेवर व्याज मिळत राहते. एकूण २१ वर्षांनी, म्हणजे मुलीच्या वयाच्या २१व्या वर्षी ही योजना मॅच्युअर होते आणि संपूर्ण रक्कम काढता येते.
उदाहरणार्थ, जर एखाद्या पालकाने आपल्या १ वर्षाच्या मुलीसाठी २०२५ मध्ये खाते उघडले, तर ते २०४६ मध्ये मॅच्युअर होईल. दरवर्षी ₹१,५०,००० गुंतवले गेले, तर मॅच्युरिटीवेळी जवळपास ₹७० लाखांचा निधी तयार होतो.
अंशतः पैसे काढण्याची सुविधा
मुलगी १८ वर्षांची झाल्यानंतर, उच्च शिक्षणासाठी किंवा इतर आवश्यकतेसाठी मॅच्युरिटी रकमेच्या ५०% पर्यंतची रक्कम काढण्याची मुभा आहे. उर्वरित रक्कम फक्त २१ वर्षांनंतरच काढता येते, म्हणजेच लग्नासाठी किंवा इतर गरजांसाठी ठोस आर्थिक सहाय्य मिळते.
गुंतवणुकीचे गणित – ७० लाखांचा निधी कसा तयार होतो?
या योजनेतील व्याज चक्रवाढ पद्धतीने मिळते आणि म्हणून दीर्घकालीन गुंतवणुकीने मोठा निधी तयार होतो. जर एखाद्या पालकाने आपल्या मुलीच्या जन्मानंतर लगेचच खाते उघडले आणि पुढील १५ वर्षांपर्यंत दरवर्षी ₹१,५०,००० गुंतवले, तर एकूण गुंतवलेली रक्कम ₹२२,५०,००० इतकी होईल. यावर मिळणाऱ्या ८.२% चक्रवाढ व्याजामुळे मॅच्युरिटीवेळी एकूण रक्कम ₹६९,२७,५७८ (जवळपास ७० लाख रुपये) होऊ शकते. यामध्ये ₹४६.७७ लाखांचा फायदा केवळ व्याजातून मिळतो, तोही पूर्णपणे करमुक्त.
कर लाभ – गुंतवणुकीवर तीनही टप्प्यांवर सूट
सुकन्या समृद्धी योजना ‘EEE’ प्रकारात मोडते, म्हणजे:
-
गुंतवणूक केल्यावर (१.५० लाख पर्यंत) ८०सी अंतर्गत करसवलत
-
वार्षिक व्याज करमुक्त
-
मॅच्युरिटीवरील संपूर्ण रक्कम करमुक्त
ही वैशिष्ट्ये सुकन्या समृद्धी योजनेला इतर कोणत्याही योजना किंवा बचतीपेक्षा वेगळी आणि आकर्षक बनवतात.