भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) सहकारी बँकिंग क्षेत्रातील आणखी एका संस्थेवर कारवाई करत कर्नाटकातील ‘कारवार अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक’चा परवाना रद्द केला आहे. या निर्णयामुळे बँकेच्या ग्राहकांना आता त्यांच्या खात्यातून व्यवहार करता येणार नाहीत आणि बँकेच्या दैनंदिन बँकिंग सेवा पूर्णपणे बंद केल्या जातील.

का रद्द करण्यात आला बँकेचा परवाना?

RBI च्या तपासणीत आढळून आले की, कारवार अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेकडे पुरेसे भांडवल नाही, तसेच कमाईची शाश्वत क्षमताही नसल्याचे स्पष्ट झाले. आर्थिकदृष्ट्या बँक सुदृढ स्थितीत नसल्यामुळे तिच्या भविष्यातील व्यवहारक्षमतेवर शंका निर्माण झाली. परिणामी, २३ जुलै २०२५ पासून या बँकेचे सर्व व्यवहार बंद करण्यात आले आहेत.

ठेवीदारांच्या पैशांचं काय?

आरबीआयने स्पष्ट केले आहे की, या बँकेच्या ठेवीदारांना ‘डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन’ (DICGC) कडून ठेव विमा अंतर्गत ५ लाख रुपयांपर्यंत रक्कम मिळणार आहे. यासाठी बँकेच्या लिक्विडेशन प्रक्रियेची सुरूवात करण्यात येईल आणि लिक्विडेटरची नियुक्ती केली जाईल.

विशेष बाब म्हणजे, बँकेने आरबीआयकडे सादर केलेल्या आकडेवारीनुसार सुमारे ९२.९ टक्के ठेवीदारांची ठेव रक्कम ५ लाख रुपयांच्या आत आहे. त्यामुळे या ग्राहकांना DICGC मार्फत पूर्ण रक्कम परत मिळण्याची हमी आहे.

रजिस्ट्रारकडून बँक बंद करण्याची प्रक्रिया सुरू

RBI ने कर्नाटकच्या सहकारी संस्था निबंधकाला पत्र पाठवून बँकेच्या अधिकृत बंद प्रक्रियेचा आदेश देण्याची विनंती केली आहे. त्यानंतर लिक्विडेटरची नियुक्ती करून बँकेची संपत्ती विक्री प्रक्रियेची सुरुवात केली जाईल, आणि त्यातून ठेवीदारांना पैसे परतफेड केले जातील.

यापूर्वीही अनेक बँकांवर कारवाई

RBI ने यापूर्वीही अनेक सहकारी बँकांचे परवाने रद्द केले आहेत. यामध्ये:

  • एचसीबीएल को-ऑपरेटिव्ह बँक (लखनौ)

  • कलर मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह बँक (अहमदाबाद)

  • अजिंठा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक (औरंगाबाद)

  • इम्पीरियल अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक (जालंधर)

या संस्थांचा समावेश आहे. या कारवाया बँकिंग प्रणालीतील पारदर्शकता आणि ठेवीदारांच्या हितासाठी करण्यात आल्याचे RBI ने स्पष्ट केले आहे.

ठेवीदारांनी काय करावे?

ग्राहकांनी DICGC कडून आपल्या ठेवीबाबतची माहिती घेऊन रक्कम मिळवण्यासाठी संबंधित दावा प्रक्रियेत सहभाग घ्यावा. अधिक माहितीसाठी ग्राहकांनी बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा DICGC कडून मिळणाऱ्या सुचनांकडे लक्ष ठेवणं आवश्यक आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *