Jio IPO Update: देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वातील रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) आता त्यांच्या टेलिकॉम शाखेचे – जिओ इन्फोकॉम – स्वतंत्ररित्या शेअर बाजारात लिस्टिंग करण्याच्या तयारीत आहे. संभाव्यतः ५२,२०० कोटी रुपयांच्या (सुमारे ६ अब्ज डॉलर) या सार्वजनिक इश्यूद्वारे, भारतातला आतापर्यंतचा सर्वात मोठा IPO आणण्याचा रिलायन्सचा मानस आहे.
केवळ ५% हिस्सा विकण्याची योजना
रिलायन्स जिओच्या संभाव्य IPO बाबत ब्लूमबर्गने दिलेल्या माहितीनुसार, RIL केवळ ५% हिस्सा विकण्याची योजना आखत आहे. मात्र, भारतीय बाजारात सध्याच्या IPO मार्गदर्शक तत्त्वांनुसार कंपन्यांना किमान २५% हिस्सा पब्लिक इश्यूद्वारे विकावा लागतो. यामुळे रिलायन्सने बाजार नियंत्रक SEBIकडे विशेष सवलतीची मागणी केली आहे. RIL चे मत आहे की, एवढ्या मोठ्या IPO साठी सध्या बाजारात पुरेशी मागणी निर्माण होईलच असे नाही.
२०२५ च्या सुरुवातीला IPO लाँच होण्याची शक्यता
सूत्रांच्या माहितीनुसार, जिओचा IPO २०२५ च्या पहिल्या तिमाहीत लाँच केला जाऊ शकतो. मात्र, अंतिम निर्णय बाजारातील वातावरण, गुंतवणूकदारांचा प्रतिसाद आणि नियामक मंजुरीवर अवलंबून असेल. IPO यशस्वी ठरल्यास तो Hyundai Motors Indiaच्या प्रस्तावित ₹२८,००० कोटींच्या इश्यूचाही विक्रम मोडू शकतो.
जिओचे वाढलेले मूल्यांकन आणि गुंतवणूकदार
२०२० मध्ये Meta Platforms आणि Alphabet Inc. (Google ची पालक कंपनी) यासह अनेक जागतिक कंपन्यांनी जिओमध्ये जवळपास $२० अब्जची गुंतवणूक केली होती. त्या वेळी जिओचे एकूण मूल्यांकन $५८ अब्ज होते. आज या गुंतवणुकीच्या पार्श्वभूमीवर, जिओचे market valuation $१०० अब्जच्या पुढे जाईल, असा उद्योग विश्लेषकांचा अंदाज आहे. यामध्ये KKR, General Atlantic, आणि अबू धाबी इन्व्हेस्टमेंट अथॉरिटी यांचाही सहभाग होता.
जिओ IPO चे महत्त्व आणि परिणाम
रिलायन्स जिओचा IPO भारतासाठी केवळ आर्थिकदृष्ट्या नव्हे तर बाजारातील गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढवणारा टप्पा असेल. IPO लिस्टिंगमुळे RIL ला टेलिकॉम क्षेत्रातील मूल्य उघड करण्याची संधी मिळेल, तसेच गुंतवणुकीच्या माध्यमातून आगामी वर्षांत नेटवर्क विस्तार, 5G सेवा आणि डिजिटल प्लॅटफॉर्म्समध्ये नव्याने भर टाकता येईल.