जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेले इलॉन मस्क यांचे जीवनप्रवास हे केवळ यशाचे नव्हे तर संकटांवर मात करण्याचे देखील उदाहरण आहे. त्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून संघर्ष करत एकामागून एक अशी कंपन्या उभारल्या, ज्यांनी जगाच्या अर्थव्यवस्थेचा आणि तंत्रज्ञानाच्या विकासाचा चेहरामोहरा बदलला. ट्रम्प प्रशासनात सल्लागार म्हणून काही काळ काम केल्यानंतर त्यांनी ती जबाबदारी सोडून पुन्हा स्वतःच्या कंपन्यांवर लक्ष केंद्रीत केले. मात्र त्यांची खरी यशोगाथा त्यांच्या अखंड प्रयत्न, दूरदृष्टी, आणि संकटांतील संधी शोधण्याच्या वृत्तीमधून आकार घेतलेली आहे.
लहानपणाची गरिबी आणि कौटुंबिक संघर्ष
इलॉन मस्क यांचा जन्म दक्षिण आफ्रिकेमध्ये झाला. त्यांचे वडील इरॉल मस्क व्यवसायात अपयशी ठरले आणि घराची आर्थिक परिस्थिती इतकी बिघडली की, कॉलेजची फी भरण्यासाठी इलॉन यांना मित्रांकडून पैसे घ्यावे लागले. अनेक रात्री त्यांनी जमिनीवर झोपून काढल्या. त्यांच्या लहानपणीच घरात मोठा आर्थिक गोंधळ होता. मात्र, याच काळात त्यांनी स्वतःमध्ये विश्वास ठेवला आणि वयाच्या १२ व्या वर्षीच एक व्हिडीओ गेम बनवून तो ५०० डॉलर्सना विकला. हीच त्यांची उद्योजकीय प्रवृत्तीची पहिली ठिणगी ठरली.
पहिली कंपनी ‘Zip2’ आणि व्यवसायातील प्रवेश
१९९५ मध्ये त्यांनी ‘Zip2’ नावाची एक वेब सॉफ्टवेअर कंपनी सुरू केली. त्यावेळी इंटरनेटचा फारसा प्रसार नव्हता, तरीही मस्क यांनी भविष्याची दिशा ओळखली होती. ही कंपनी नंतर १९९९ मध्ये ३०७ दशलक्ष डॉलर्सना विकली गेली, ज्यातून त्यांना मोठा भांडवल सापडले. त्यानंतर त्यांनी ‘X.com’ नावाची ऑनलाईन पेमेंट कंपनी सुरू केली, जी पुढे ‘PayPal’ बनली आणि नंतर ती १.५ अब्ज डॉलर्सना eBay ने खरेदी केली. यामुळे मस्क यांना तंत्रज्ञान उद्योगात एक पक्का पाय मिळाला.
टेस्ला आणि स्पेसएक्सची संकटांनी भरलेली सुरुवात
इलॉन मस्क यांच्या यशाचा खरा टप्पा सुरू झाला तो टेस्ला आणि स्पेसएक्स या कंपन्यांमुळे. पण या कंपन्यांची सुरुवात अत्यंत कठीण परिस्थितीत झाली. २००८ मध्ये दोन्ही कंपन्या दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर होत्या. टेस्ला दरमहा ४ दशलक्ष डॉलर्स जळवत होती, एकही कार विकलेली नव्हती आणि ग्राहकांचे बुकिंग रद्द होत होते. स्पेसएक्सचे रॉकेट्स सतत अपयशी ठरत होते. कंपनी चालवण्यासाठी केवळ ३ आठवड्यांचा निधी शिल्लक होता.
‘करो या मरो’ निर्णय: स्वतःची संपत्ती पणाला
या संकटकाळात मस्क यांनी ख्रिसमसच्या दिवशी एक महत्त्वपूर्ण बोर्ड बैठक बोलावली. त्यांनी त्यांची शेवटची २० दशलक्ष डॉलर्सची संपत्ती टेस्लामध्ये गुंतवण्याचा निर्णय घेतला, परंतु त्यांनी अट घातली की इतर गुंतवणूकदारांनीही तितकीच रक्कम गुंतवावी. हे धाडस अनेक गुंतवणूकदारांना धास्तावणारे होते, परंतु मस्क यांच्या आत्मविश्वासाने त्यांना प्रेरित केले. शेवटी गुंतवणूकदार तयार झाले आणि टेस्ला वाचली.
आजचा यशाचा शिखर
आज टेस्ला ही जगातील सर्वात मौल्यवान ऑटोमोबाईल कंपनी आहे. स्पेसएक्स हे खासगी अंतराळ संशोधन करणारे जगातील प्रमुख केंद्र ठरले आहे. मस्क यांची नेट वर्थ ४२८ अब्ज डॉलर्सच्या पुढे गेली आहे. त्यांनी ‘Neuralink’, ‘The Boring Company’, आणि ‘Starlink’ सारख्या अनेक प्रकल्पांना आकार दिला. त्यांनी केवळ आर्थिक यश मिळवले नाही, तर तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात क्रांती घडवली.