Jyoti Reddy Success Story: आयुष्यात यश मिळवण्यासाठी मोठ्या संसाधनांची गरज नसते, तर गरज असते ती दुर्दम्य इच्छाशक्ती, अपार मेहनत आणि चिकाटीची. हे सिध्द केलं आहे तेलंगणाच्या एका सामान्य कुटुंबात जन्मलेल्या आणि आज अमेरिकेत यशस्वी उद्योजिकेच्या भूमिकेत असलेल्या ज्योती रेड्डी यांनी. एकेकाळी शेतमजुरी करून दिवसाला केवळ ५ रुपये मिळवणाऱ्या ज्योती आज एका सॉफ्टवेअर कंपनीच्या CEO म्हणून १०० हून अधिक कर्मचाऱ्यांना रोजगार देत आहेत.

प्रारंभ: अति गरीब कुटुंबात जन्म

१९७० मध्ये तेलंगणाच्या वारंगल जिल्ह्यात एका अत्यंत गरीब कुटुंबात ज्योती रेड्डी यांचा जन्म झाला. पाच बहिणींमध्ये सर्वात धाकटी असलेल्या ज्योती यांनी आपल्या शिक्षणासाठी प्रचंड संघर्ष केला. गरिबी इतकी की त्यांची आई त्यांना अनाथाश्रमात राहायला पाठवते. मात्र, शिक्षणाविषयीची त्यांची आवड इतकी तीव्र होती की त्यांनी अनाथाश्रमात राहूनही दहावीची परीक्षा प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण केली.

किशोरवयात लग्न आणि आर्थिक संघर्ष

ज्योतींच्या शिक्षणाची वाटचाल सुरू असतानाच, केवळ १६व्या वर्षी त्यांचे लग्न लावले गेले. लग्नानंतरही जीवनात सुधारणा झाली नाही. नव्या जबाबदाऱ्या, आर्थिक अडचणी आणि गरिबी यामुळे त्यांनी शेतात दिवसाला १०-१० तास काम करून ५ रुपये मजुरी कमावली. याशिवाय त्या एक रुपयात पेटीकोट शिवून थोडी अधिक कमाई करत असत. परिस्थिती कितीही कठीण असली तरी त्यांनी शिक्षण थांबवले नाही.

अमेरिकेचा प्रवास: एक मोठा वळणबिंदू

२००० साली त्यांच्या नातेवाइकाकडून अमेरिकेतील करिअरच्या संधींबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अमेरिकेला जाण्याचा निर्णय घेतला. पासपोर्ट आणि व्हिसा मिळवण्याच्या प्रक्रियेत अनेक अडथळे आले, पण त्यांनी हार मानली नाही.

अमेरिकेत पोहोचल्यानंतर सुरुवातीचे दिवस खडतर होते. नातेवाईकांनी निवास देण्यास नकार दिल्यानंतर त्यांनी एका गुजराती कुटुंबात पेइंग गेस्ट म्हणून वास्तव्यास सुरुवात केली. तिथून त्यांनी सेल्सगर्ल म्हणून काम करत करिअरची सुरुवात केली. नंतर एका चांगल्या कंपनीत नोकरी मिळाली, पण वर्किंग व्हिसा नसल्यामुळे ती नोकरीही गमवावी लागली आणि काही काळासाठी त्यांनी बाथरूम साफ करण्याचं कामही केलं.

संघर्षातून उभारलेलं यश

वर्किंग व्हिसासाठी झगडत असतानाच त्यांनी आपली कन्सल्टन्सी फर्म स्थापन केली. त्यानंतर त्यांनी ‘Key Software Solutions’ ही IT कंपनी सुरु केली, जी आज अमेरिकेतील नामवंत कंपन्यांना आयटी सेवा पुरवते. आज ही कंपनी १५ मिलियन डॉलर्सपेक्षा अधिक मूल्याची आहे आणि १०० हून अधिक कर्मचाऱ्यांना रोजगार देते.

ज्योती रेड्डी: प्रेरणास्त्रोत

एकेकाळी शेतात राबणाऱ्या, शिक्षणासाठी किलोमीटर चालणाऱ्या ज्योती रेड्डी आज स्वतःच्या यशस्वी व्यवसायातून अनेकांना प्रेरणा देत आहेत. महागड्या गाड्यांमधून फिरणाऱ्या, अमेरिकन कॉर्पोरेट क्षेत्रात आपला ठसा उमठवणाऱ्या या उद्योजिकेच्या यशामागे त्यांच्या संघर्षाची आणि शिक्षणाची मोठी कहाणी दडलेली आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *