खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या तब्बल 7 कोटी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कर्मचारी भविष्य निधी संघटना (EPFO) लवकरच युनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI) आणि ATM च्या माध्यमातून पैसे काढण्याची सुविधा सुरू करणार आहे. या नव्या सुविधेमुळे तुम्हाला तुमच्या EPF खात्यातून पैसे काढणे आणखी सोपे आणि जलद होणार आहे.
कधीपासून मिळणार ही सुविधा?
लेबर आणि रोजगार सचिव सुमिता डेवरा यांनी मंगळवारी सांगितलं की, लेबर आणि रोजगार मंत्रालयाने नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ची शिफारस मान्य केली आहे. ANI या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी खुलासा केला की, मे 2025 च्या शेवटी किंवा जूनच्या सुरुवातीपासून EPFO सदस्य UPI आणि ATM च्या मदतीने आपल्या प्रोव्हिडंट फंडातून पैसे काढू शकतील.
1 मिनिटात 1 लाख रुपये हातात!
सचिवांनी सांगितलं की, मे-जूनपासून EPFO सदस्यांना त्यांच्या पीएफ खात्यातून अवघ्या काही क्षणांत 1 लाख रुपये काढता येतील. UPI च्या मदतीने खात्याचा बॅलन्स तपासता येईल आणि स्वयंचलित प्रणालीद्वारे तात्काळ पैसे ट्रान्सफर करता येतील. इतकंच नाही, तर तुम्ही तुमच्या आवडीच्या बँक खात्यात हे पैसे ट्रान्सफर करू शकता. ही सुविधा शिक्षण, घर खरेदी, लग्न यांसारख्या कारणांसाठीही वापरता येणार आहे.
95% क्लेम झाले ऑटोमेटेड, प्रक्रिया फक्त 3 दिवसांची!
EPFO ने डिजिटलायझेशनच्या दिशेने मोठी पावलं उचलली आहेत. 120 हून अधिक डेटाबेस एकत्र करून क्लेम प्रक्रिया सुलभ केली आहे. आता 95% क्लेम ऑटोमेटेड झाले असून, पैसे मिळवण्यासाठी फक्त 3 दिवस लागतात. ही प्रक्रिया आणखी सोपी करण्यावर काम सुरू आहे.
7 कोटी लोकांना काय फायदा होणार?
सध्या EPFO सदस्यांना UPI किंवा ATM ने पैसे काढता येत नाहीत. पण ही सुविधा सुरू झाल्यावर 2-3 दिवसांचा वेळ वाचणार आहे. आता पैसे काढायला फक्त काही तास किंवा मिनिटं लागतील. यामुळे 7 कोटींहून अधिक सदस्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.