आता १४ जून २०२६ पर्यंत मिळणार मोफत अपडेटची संधी

भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) ने आधार कार्डधारकांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. myAadhaar पोर्टलवरून आधारमध्ये मोफत ऑनलाइन दस्तऐवज अपडेट करण्याची अंतिम तारीख आता १४ जून २०२६ पर्यंत वाढवण्यात आली आहे. या निर्णयामुळे लाखो नागरिकांना त्यांची माहिती निशुल्क सुधारण्याची एक अंतिम आणि महत्त्वाची संधी मिळाली आहे.

मोफत अपडेट कोणासाठी आणि कसे?

UIDAI च्या माहितीनुसार, ही मोफत सेवा फक्त लोकसंख्याशास्त्रीय माहिती (Demographic Details) – जसे की नाव, पत्ता, जन्मतारीख, लिंग इत्यादी अपडेट करण्यासाठी लागू आहे. नागरिक myAadhaar पोर्टलवर लॉगइन करून आवश्यक कागदपत्रे अपलोड करून आपले आधार अपडेट करू शकतात. या प्रक्रियेसाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही.

UIDAI ने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (पूर्वीचे ट्विटर) वरून ही माहिती जाहीर करताना म्हटले आहे की, “लाखो आधार धारकांना फायदा व्हावा, यासाठी myAadhaar पोर्टलवर मोफत दस्तऐवज अपलोड करण्याची सुविधा आता १४ जून २०२६ पर्यंत उपलब्ध आहे.

कोणते आधार धारक तातडीने अपडेट करावे?

UIDAI कडून असे सांगण्यात आले आहे की, ज्यांनी १० वर्षांपूर्वी आधार कार्ड घेतले आहे आणि त्यानंतर कधीही कागदपत्रे अपडेट केलेली नाहीत, त्यांनी हे अपडेट त्वरित करावे. कारण अनेक वेळा पत्त्यात, नावात किंवा इतर माहितीमध्ये बदल झाल्यामुळे सरकारी सेवा किंवा KYC प्रक्रियेत अडथळे येऊ शकतात.

मोबाईल, बायोमेट्रिक्स अपडेटसाठी काय प्रक्रिया?

जर तुमचा मोबाईल नंबर, ईमेल आयडी, फोटो किंवा बायोमेट्रिक माहिती (फिंगरप्रिंट, आयरिस) अपडेट करायचा असेल, तर तुम्हाला जवळच्या आधार नोंदणी केंद्राला प्रत्यक्ष भेट देणे आवश्यक आहे. ही सेवा मोफत नसून, त्यासाठी नियोजित शुल्क भरावे लागते.

ही सुविधा वापरणं का आवश्यक आहे?

आधार कार्ड हे बँक, सरकारी योजना, SIM कार्ड, पॅन कार्ड लिंकिंग, पासपोर्ट व इतर महत्त्वाच्या सेवांसाठी वापरले जाते. त्यामुळे त्यामधील माहिती नेहमी अचूक असणे आवश्यक आहे. जर तुमच्या आधारमधील माहिती चुकीची किंवा जुनी असेल, तर भविष्यात सरकारी योजनांचा लाभ घेताना अडचणी येऊ शकतात.

शेवटची संधी गमावू नका

१४ जून २०२६ नंतर या मोफत सेवेचा लाभ घेता येणार नाही, आणि त्यानंतर आधार अपडेटसाठी नियमित शुल्क आकारले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुमचा पत्ता, नाव किंवा इतर माहिती जुनी असेल, तर ही संधी वाया जाऊ देऊ नका. घरबसल्या, myAadhaar पोर्टलच्या माध्यमातून हे अपडेट करून घ्या आणि भविष्यातील अडचणी टाळा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *