गुगलने अलीकडेच घेतलेला निर्णय अनेक कर्मचाऱ्यांसाठी धक्कादायक ठरला आहे. अँड्रॉइड सॉफ्टवेअर, पिक्सेल फोन आणि क्रोम ब्राउझरसारख्या महत्त्वाच्या युनिट्समधील शेकडो कर्मचाऱ्यांना अचानक बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. यामुळे सुमारे २५,००० कर्मचाऱ्यांच्या नोकरीच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे.
नोकर कपात कोणत्या विभागात?
गुगलच्या अँड्रॉइड, क्रोम, क्रोमओएस, पिक्सेल, फिटबिट, गुगल फोटोज, गुगल वन आणि नेस्ट यांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या उत्पादनांवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये ही कपात झाली आहे. हे सर्व युनिट्स अल्फाबेटच्या टेक्नॉलॉजी स्ट्रॅटेजीचा केंद्रबिंदू मानले जात होते. गुगलच्या ही नवीन धोरणात्मक पावलं उत्पादनांमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) चे अधिक समावेश करण्यासाठी उचलली गेली असल्याचं सांगितलं जातं.
नोकर कपातीमागचं कारण काय?
नोकर कपातीचं मुख्य कारण म्हणजे कंपनीच्या अंतर्गत पुनर्रचना आणि खर्चात कपात करण्याची गरज. २०२४ मध्ये गुगलच्या वरिष्ठ उपाध्यक्ष रिक ऑस्टरलोह यांच्या नेतृत्वाखाली अँड्रॉइड आणि हार्डवेअर विभागांचं एकत्रीकरण करण्यात आलं. यामुळे कंपनी अधिक AI-केंद्रित बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. याच अनुषंगाने, २०२५ च्या सुरुवातीस कंपनीने स्वैच्छिक एक्झिट प्रोग्राम लागू केला होता, ज्याअंतर्गत कर्मचाऱ्यांना संधी देण्यात आली की त्यांनी इच्छेनुसार कंपनी सोडावी.
ट्रम्पच्या टॅरिफ धोरणाचा अप्रत्यक्ष परिणाम?
डोनाल्ड ट्रम्प यांच्या आक्रमक टॅरिफ धोरणाचाही अप्रत्यक्ष परिणाम या नोकर कपातीवर झाला आहे. आयात शुल्क लागू केल्यानंतर जागतिक व्यापारात अनिश्चितता निर्माण झाली असून, त्याचा परिणाम बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या उत्पादन व विक्री रणनीतीवर झाला आहे. गुगलही याला अपवाद राहिलेला नाही. अनेक देशांमध्ये उत्पादन खर्च वाढल्यामुळे आणि जागतिक आर्थिक मंदीच्या भीतीमुळे गुगलला त्यांची कामकाज पद्धती आणि खर्च यामध्ये बदल करण्याची गरज भासली.
कर्मचाऱ्यांवर काय परिणाम?
या कपातीमुळे कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. गुगल ही कंपनी उच्च दर्जाच्या सुविधा, वेतन आणि कामाचा आनंददायी अनुभव यासाठी प्रसिद्ध होती. मात्र गेल्या काही वर्षांत सतत होणाऱ्या कपातींमुळे कर्मचाऱ्यांमध्ये अस्थिरतेचं वातावरण निर्माण झालं आहे. विशेषतः अँड्रॉइड आणि पिक्सेल युनिट्समध्ये काम करणाऱ्यांना हे धक्कादायक ठरलं आहे, कारण हे विभाग गुगलच्या इनोव्हेशनचा केंद्रबिंदू मानले जात होते.