अमेरिकेतील प्रसिद्ध अंडरगारमेंट आणि शेपवेअर कंपनी ‘स्पॅन्क्स’ (Spanx) हिने ब्लॅकस्टोन (Blackstone) या गुंतवणूकदार कंपनीसोबत १.२ अब्ज डॉलर्स (सुमारे ९९०० कोटी रुपये) इतक्या प्रचंड रकमेचा करार केला. या यशाच्या पार्श्वभूमीवर संस्थापक आणि सीईओ सारा ब्लेकली यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना एक अशी भेट दिली, जी संपूर्ण जगात कौतुकाचा विषय ठरली आहे. त्यांनी जवळपास ५०० कर्मचाऱ्यांना जगात कुठेही जाण्यासाठी दोन प्रथम श्रेणीच्या विमान तिकिटे आणि खर्चासाठी प्रत्येकी १०,००० डॉलर्स रोख स्वरूपात दिले.

पार्टीतच उघड झाला आनंदाचा बॉक्स

या भेटीची घोषणा एका भव्य पार्टीत करण्यात आली. सारा ब्लेकली यांनी स्वतः या क्षणाचा व्हिडिओ आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला, जो पाहून अनेकांची छाती अभिमानाने भरून आली. कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद, जल्लोष, आणि भावनिक प्रतिक्रिया स्पष्ट दिसत होत्या. काही कर्मचाऱ्यांनी हे तिकिट आणि रोख रक्कम हनिमून, अंतरराष्ट्रीय लग्नसोहळा किंवा स्वप्नातील सहलीसाठी वापरण्याची योजना आखल्याचं सांगितलं. दक्षिण आफ्रिका, स्वीडन, क्रोएशिया आणि अगदी अंटार्क्टिकासारख्या ठिकाणी जाण्याचीही योजना काहींनी जाहीर केली.

किती खर्च केला ब्लेकली यांनी?

या भव्य भेटीमागे केवळ भावना नव्हती, तर मोठा आर्थिक खर्चही होता. एका कर्मचाऱ्याला दिलेले १०,००० डॉलर्स रोख आणि दोन फर्स्ट क्लास विमान तिकिटांचा अंदाजे खर्च १०,००० डॉलर्स इतका मानल्यास, ५०० कर्मचाऱ्यांसाठी हा एकूण खर्च जवळपास १ कोटी डॉलर्स होतो – म्हणजे २०२१ च्या विनिमय दरानुसार सुमारे ८३ कोटी रुपये. इतका खर्च केवळ कर्मचाऱ्यांच्या आनंदासाठी केल्यामुळे सारा ब्लेकली यांना ‘दिलदार महिला’ म्हणणं योग्य ठरतं.

स्पॅन्क्स कंपनी – एक स्त्रीने घडवलेला ब्रँड

स्पॅन्क्स ही २००० साली सारा ब्लेकली यांनी सुरु केलेली कंपनी आहे. सुरुवातीला ही कंपनी शेपवेअर आणि महिलांसाठी आरामदायी व फिगर-हगिंग अंडरगारमेंट्स तयार करायची. हळूहळू कंपनीने लेगिंग्ज, जीन्स, स्विमवेअर आणि अगदी पुरुषांसाठी शेपवेअर देखील बाजारात आणलं. मुख्यालय अटलांटा, जॉर्जियामध्ये असलेली ही कंपनी आता जागतिक ब्रँड बनली आहे. मोठ्या रिटेल स्टोअर्समध्ये आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्म्सवर यांची उत्पादने मोठ्या प्रमाणावर विकली जातात.

बॉस की प्रेरणा?

सारा ब्लेकली यांचा हा gesture फक्त उदारतेचा नव्हता, तर नेतृत्वाचा एक अद्वितीय आदर्श होता. अशा प्रकारचे निर्णय कर्मचारी आणि कंपनी यांच्यातील नातं घट्ट करतं. कर्मचाऱ्यांच्या योगदानाची जाणीव ठेवणं आणि त्यासाठी प्रत्यक्ष कृती करणं हे नेतृत्वात दुर्मिळ असतं. स्पॅन्क्सच्या या उदाहरणातून इतर कंपन्यांनीही शिकण्यासारखं खूप आहे – की केवळ पगार देणं पुरेसं नसतं, तर कर्मचारी आपल्यासाठी काय महत्त्वाचे आहेत हे वेळोवेळी दाखवणंही तितकंच गरजेचं असतं.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *