कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) ने आपल्या सदस्यांसाठी महत्त्वपूर्ण बदल करत, PF क्लेमवर मिळणाऱ्या व्याज दरांमध्ये सुधारणा केली आहे. यामुळे EPF क्लेम सेटलमेंट करताना, सदस्यांना आता प्रत्यक्ष सेटलमेंटच्या तारखेपर्यंत व्याज दिलं जाणार आहे. याआधी, सेटलमेंट जर महिन्याच्या २४ तारखेपूर्वी झालं, तरी व्याज मागील महिन्याच्या अखेरीपर्यंतच दिलं जात होतं. त्यामुळे क्लेम सादर केल्यानंतरपासून ते प्रत्यक्ष रक्कम मिळेपर्यंतच्या दिवसांचा व्याजाचा फटका सदस्यांना बसत होता.

काय आहे सध्याची तरतूद आणि काय होणार बदल?

सध्याच्या व्यवस्थेनुसार, जर कोणी सदस्य पीएफ क्लेम दाखल केला आणि तो महिन्याच्या २४ तारखेपूर्वी सेटल झाला, तर त्याला फक्त मागील महिन्याच्या अखेरीपर्यंतचेच व्याज मिळतं. उर्वरित दिवसांचं व्याज मिळत नव्हतं. नवीन दुरुस्तीप्रमाणे, आता सेटलमेंटच्या अंतिम तारखेपर्यंतचे व्याज सदस्यांना दिलं जाईल.

यामुळे दोन गोष्टी घडणार:

  1. सदस्याला अधिक व्याज मिळेल.

  2. क्लेम प्रक्रियेमध्ये होणारा उशीर टळेल, कारण अधिकाधिक प्रकरणांवर महिन्याभर प्रक्रिया केली जाईल.

CBT बैठकीत मंजुरी

EPFO च्या केंद्रीय विश्वस्त मंडळ (Central Board of Trustees – CBT) च्या बैठकीत EPF योजना, 1952 मधील परिच्छेद 60(2)(b) मध्ये सुधारणा करण्याची शिफारस एकमताने पारित झाली. यामध्ये क्लेम सेटलमेंटच्या तारखेपर्यंत व्याज देण्याचा मुद्दा महत्त्वाचा होता.

व्याजदर वाढीमुळे आर्थिक फायदा

या नव्या नियमामुळे लाखो EPF सदस्यांना थेट आर्थिक फायदा होईल. आधी फक्त महिन्याच्या अखेरीपर्यंत मिळणाऱ्या व्याजामुळं काही रक्कम गमावली जात होती, ती आता वाचणार आहे. दीर्घकाळ क्लेम प्रक्रियेमुळे रेंगाळणाऱ्या तक्रारीही आता कमी होतील.

नवीन नियम कधीपासून लागू होणार?

EPFO कडून अद्याप नवीन दुरुस्ती अमलात येण्याची तारीख अधिकृतपणे घोषित करण्यात आलेली नाही. मात्र, सरकारी नोटिफिकेशन जारी झाल्यानंतर हा नियम अंमलात येईल. त्यामुळे कर्मचारी आणि सदस्यांनी EPFO च्या अधिकृत वेबसाइट किंवा खात्याच्या अपडेट्सकडे लक्ष ठेवणं गरजेचं आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *