महागाई वाढत असताना, मासिक वेतनातून घरखर्च, बचत आणि स्वतःच्या इच्छांच्या पूर्ततेचे संतुलन राखणे अनेकांसाठी कठीण बनते. पगार हातात आला की त्याचे योग्य नियोजन न केल्यास महिन्याअखेरीस पैसे कमी पडण्याची वेळ अनेकांवर येते. म्हणूनच बचतीचे शिस्तबद्ध नियोजन अत्यंत महत्त्वाचे ठरते. अशा परिस्थितीत १५:६५:२० फॉर्म्युला एक उत्तम आर्थिक मार्गदर्शक ठरू शकतो.
१५:६५:२० फॉर्म्युला म्हणजे काय?
हा फॉर्म्युला तुमच्या मासिक उत्पन्नाचे तीन भागात वर्गीकरण करतो — बचत, आवश्यक खर्च आणि वैयक्तिक गरजा. यातून तुम्ही प्रत्येक भागासाठी ठराविक टक्केवारीने रक्कम बाजूला काढता, जेणेकरून आर्थिक संतुलन साधता येते.
1. बचत – १५%
मासिक पगाराचा १५% भाग सर्व प्रकारच्या खर्चांपासून वेगळा ठेवून तो बचतीसाठी वापरायचा आहे. ही रक्कम अगदी महिन्याच्या सुरुवातीलाच बाजूला काढणे आवश्यक आहे. या रकमेची गुंतवणूक बँक मुदत ठेव, पोस्ट ऑफिस योजना, पीपीएफ, म्युच्युअल फंड किंवा अन्य सुरक्षित पर्यायांमध्ये केली जाऊ शकते. या भागात कोणतीही तडजोड करू नये. ही बचत आपत्कालीन परिस्थितीत किंवा भविष्यातील मोठ्या गरजांसाठी उपयोगी पडते.
2. आवश्यक खर्च – ६५%
पगाराचा सर्वाधिक म्हणजे ६५% भाग रोजच्या गरजेच्या आणि अपरिहार्य खर्चासाठी राखून ठेवावा. यामध्ये घरभाडे, किराणा सामान, शालेय फी, वीज बिल, वाहतूक खर्च, आरोग्य सेवांचा खर्च, मोबाईल-इंटरनेट बिल यांचा समावेश होतो. या खर्चांमध्ये कपात करणे शक्य नसते, त्यामुळे यावर प्राधान्याने नियंत्रण ठेवावे.
3. वैयक्तिक खर्च – २०%
पगारातील २०% रक्कम तुमच्या वैयक्तिक इच्छांसाठी राखीव ठेवावी. यात सिनेमाला जाणे, हॉटेलात जेवण, प्रवास, कपड्यांची खरेदी, इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स किंवा इतर छंद यांच्या खर्चाचा समावेश होतो. ही रक्कम पूर्णपणे खर्च करण्याऐवजी अंशतः वाचवली तरी चालते. काही वेळेस या खर्चात कपात करून ती रक्कम बचतीकडे वळवली तर अधिक फायदेशीर ठरते.
या फॉर्म्युलाचा उपयोग कसा होतो?
-
हा फॉर्म्युला वापरल्यास मासिक वेतनाचे नियोजन अधिक सुसूत्र आणि सोपे होते.
-
खर्चावर योग्य नियंत्रण राहते आणि अनावश्यक खर्च टाळता येतो.
-
भविष्यासाठी आर्थिक सुरक्षा तयार करता येते.
-
बचतीची सवय लागते आणि आपत्कालीन निधीही निर्माण होतो.
-
मानसिक तणाव कमी होतो कारण प्रत्येक खर्चासाठी ठराविक रक्कम आधीपासून राखीव असते.