प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारनं आपल्या पहिल्या कार्यकाळात अनेक महत्त्वाच्या योजना राबवल्या. या योजनांचा उद्देश समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना मूलभूत आर्थिक सुरक्षा आणि सामाजिक आधार प्रदान करणे हाच होता. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBY) ही त्यापैकी एक महत्त्वाची योजना असून, केवळ २० रुपयांच्या वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांपर्यंतचे विमा संरक्षण उपलब्ध करून दिले जाते. ही योजना विशेषतः गरीब, शेतकरी, कामगार, आणि अनियमित रोजगार करणाऱ्या नागरिकांसाठी उपयुक्त ठरते.
काय आहे प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना?
ही योजना मुख्यतः अपघाती मृत्यू आणि अपंगत्वासाठी विमा कवच प्रदान करते. ही एक वर्ष कालावधीची योजना आहे, जी दरवर्षी नूतनीकरण केली जाते. या योजनेत सहभागी होण्यासाठी इच्छुक व्यक्तीचं वय १८ ते ७० वर्षांच्या दरम्यान असावं लागतं. तसेच संबंधित व्यक्तीचं बँक खाते किंवा पोस्ट ऑफिस बचत खाते असणं आवश्यक आहे. जे लोक आपल्या खात्याचा वापर नियमितपणे करतात आणि कमी खर्चात विमा कवचाची अपेक्षा करतात, त्यांच्यासाठी ही योजना अत्यंत फायदेशीर आहे.
या योजनेअंतर्गत लाभार्थ्याला:
-
अपघाती मृत्यू झाल्यास किंवा दोन्ही डोळ्यांना/पायांना/हातांना कायमस्वरूपी इजा झाल्यास ₹२,००,००० चे विमा कवच मिळते.
-
अपघातात एका डोळ्याला किंवा एका हाताला/पायाला कायमस्वरूपी इजा झाल्यास ₹१,००,००० चे कवच मिळते.
-
यासाठी केवळ २० रुपये वार्षिक प्रीमियम भरावा लागतो, जो ऑटो-डेबिट पद्धतीने थेट खात्यातून कापला जातो.
नोंदणीसाठी इच्छुक व्यक्ती आपली बँक शाखा, बँकेचे ग्राहक सेवा केंद्र (BC Point), किंवा बँकेची अधिकृत वेबसाइट वापरू शकतात. पोस्ट ऑफिस खातेदारांनी जवळच्या पोस्ट ऑफिसला भेट देऊन नोंदणी करावी.
प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना – सर्वसामान्यांसाठी जीवन विमा संरक्षण
जीवन विमा कमी खर्चात
प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY) ही अशी योजना आहे जी कोणत्याही कारणास्तव मृत्यूला कव्हर करते. जीवनातील अनिश्चिततेचा विचार करता, हे विमा संरक्षण अत्यंत मोलाचं आहे. ही योजना १८ ते ५० वयोगटातील लोकांसाठी खुली आहे. यात सहभागी झाल्यानंतर योजना वयाच्या ५५ व्या वर्षापर्यंत सुरू ठेवता येते, परंतु अट अशी की योजनेमध्ये ५० व्या वर्षीच सामील व्हायला हवं.
कव्हरेज आणि प्रीमियम
या योजनेअंतर्गत, सहभागी व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबाला ₹२,००,००० चे विमा कवच मिळतं. या योजनेसाठी दरवर्षी ₹४३६ प्रीमियम आकारला जातो, जो ग्राहकाच्या खात्यातून ऑटो-डेबिट केला जातो. ही योजना देखील बँक शाखांद्वारे, बँकेच्या वेबसाइटवरून किंवा पोस्ट ऑफिस खातेदारांसाठी पोस्ट ऑफिसद्वारे सक्रिय करता येते.