भारतात स्टारलिंकची एन्ट्री
इलॉन मस्क यांची सॅटेलाइट इंटरनेट सेवा देणारी कंपनी स्टारलिंक आता भारतात आपल्या पायापेठ तयार करण्याच्या तयारीत आहे. भारत सरकारकडून आवश्यक परवाने मिळाल्यानंतर येत्या काही महिन्यांत सेवा सुरू केली जाणार आहे. कंपनीचा मुख्य उद्देश भारतातील दुर्गम, नेटवर्कपासून वंचित भागांमध्ये हाय-स्पीड इंटरनेट पोहोचवण्याचा आहे. यासाठी स्टारलिंक एक महिना मोफत ट्रायलसुद्धा देणार आहे.

तांत्रिक बाजू आणि किंमत तुलना
स्टारलिंक एक Low Earth Orbit (LEO) उपग्रह प्रणाली वापरते, ज्यामुळे टॉवर्सशिवायही दुर्गम भागात इंटरनेट उपलब्ध होऊ शकतं. मात्र, ही अत्याधुनिक सेवा ग्राहकांना मोलाची ठरणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, स्टारलिंकचं डिव्हाइस खरेदी करायचं झाल्यास ग्राहकाला जवळपास ३३,००० रुपये खर्च करावे लागतील. त्यासोबतच मासिक अमर्यादित इंटरनेटसाठी ३,००० रुपये मासिक शुल्क आकारले जाईल.

जिओची सेवा आणि किमतीचं वास्तव
दुसऱ्या बाजूला, भारतात सध्या मुकेश अंबानी यांची रिलायन्स जिओ ब्रॉडबँडच्या क्षेत्रात प्रचंड आघाडीवर आहे. जिओ फायबर (Jio Fiber) सेवा अत्यंत परवडणाऱ्या दरात घरोघरी ऑप्टिकल फायबर नेटवर्कद्वारे इंटरनेट पोहोचवते. यामध्ये मासिक योजना ३९९ ते १,४९९ रुपये दरम्यान आहेत. जिओ बहुतेक वेळा मोफत इन्स्टॉलेशन किंवा सब्सिडी स्वरूपात उपकरणं पुरवतं, जे स्टारलिंकच्या मोठ्या प्रॉडक्ट कॉस्टच्या तुलनेत खूपच स्वस्त ठरतं.

स्टारलिंकची स्पर्धा कोणाशी?
स्टारलिंक ही भारतात परवाना मिळवणारी तिसरी सॅटेलाइट सेवा कंपनी ठरते. याआधी वनवेब (OneWeb) आणि जिओ यांना ही मान्यता मिळाली आहे. विशेष म्हणजे, मस्क यांच्या कंपनीने यंदाच्या वर्षाच्या सुरुवातीला रिलायन्स जिओ आणि भारती एअरटेलसोबत भागीदारी करण्याचे पाऊल उचलले होते. त्यामुळे स्पर्धा ही थेट असेल की सामंजस्यातून विस्तार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

सेवेचा उद्देश: शहर नव्हे तर गाव
जरी किंमतीच्या तुलनेत स्टारलिंक महाग वाटत असली, तरी कंपनीचा हेतू ग्रामीण आणि दुर्गम भागांत जिथे आजही केबल, फायबर किंवा मोबाइल नेटवर्क पोहोचलेले नाही, तिथे इंटरनेट सेवा उपलब्ध करून देणं हा आहे. म्हणजेच, ही सेवा सर्वसामान्य ग्राहकांपेक्षा अशा भागातील संघटनेला, शाळांना, आरोग्य केंद्रांना अधिक उपयुक्त ठरू शकते.

किंमत आणि मूल्याचा संघर्ष
भारतातील वापरकर्ते अजूनही किंमत-संवेदनशील आहेत. जिथे जिओ आणि एअरटेल अत्यंत कमी किमतीत ब्रॉडबँड व ५जी सेवा पुरवत आहेत, तिथे ३३,००० रुपयांचं डिव्हाइस आणि ३,००० रुपयांचा मासिक प्लॅन सामान्य ग्राहकांना परवडणार नाही. अशा परिस्थितीत स्टारलिंकला लक्ष्यित ग्राहकवर्ग अचूक ओळखून पावलं टाकावी लागतील.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *