चीनने ‘रेअर अर्थ’ खनिजांच्या निर्यातीवर लादलेल्या निर्बंधामुळे भारतातील अनेक महत्त्वाच्या औद्योगिक क्षेत्रांवर थेट परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) अर्थशास्त्रज्ञांनी सादर केलेल्या ताज्या अहवालानुसार, देशाची उत्पादन क्षमता, निर्यात धोरण आणि तंत्रज्ञानविषयक स्वावलंबन या सर्वांवर या निर्णयाचा विपरीत परिणाम होऊ शकतो.
भारतातील पाच प्रमुख क्षेत्रांवर होणार गंभीर परिणाम
एसबीआयच्या अभ्यासानुसार, चीनकडून येणाऱ्या ‘रेअर अर्थ’ खनिजांवरील निर्बंधांमुळे भारतातील वाहतूक उपकरणे, मूलभूत धातू, यंत्रसामग्री, बांधकाम, आणि इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रांना सर्वाधिक फटका बसू शकतो. यामुळे उत्पादन साखळी विस्कळीत होण्याची शक्यता असून, आगामी काळात कच्च्या मालाच्या टंचाईमुळे किंमतीतही वाढ होऊ शकते.
भारताचे चीनवर वाढते अवलंबित्व
२०२४-२५ या आर्थिक वर्षात भारताने सुमारे ३१.९ दशलक्ष डॉलर्स किमतीची ‘रेअर अर्थ’ खनिजे आणि संबंधित उत्पादने आयात केली होती. त्याचबरोबर, रेअर अर्थ चुंबकांच्या आयातीचा आकडा २९१ दशलक्ष डॉलर्स इतका होता. या वस्तू विविध तंत्रज्ञान व उत्पादनांमध्ये वापरल्या जातात आणि भारत यासाठी प्रामुख्याने चीनवर अवलंबून आहे. या खनिजांचा अभाव केवळ उत्पादनच नव्हे, तर बँकिंग व वित्तीय क्षेत्रांनाही अप्रत्यक्षपणे प्रभावित करू शकतो, असाही इशारा अहवालात दिला आहे.
देशांतर्गत खनिज शोध व उत्खननावर भर देण्याची गरज
या संकटाचा दीर्घकालीन उपाय म्हणून देशांतर्गत खनिज स्रोतांचा शोध घेणे आणि त्यांचे प्रभावी उत्खनन करणे आवश्यक असल्याचे एसबीआयच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. विशेषत: ओडिशा सरकारकडून ८,००० कोटी रुपयांची योजना जाहीर करण्यात आली असून, गंजम जिल्ह्यात ‘रेअर अर्थ’ खनिजांच्या साठ्याचा शोध घेतला जात आहे. ही पावले भारताला या महत्त्वाच्या क्षेत्रात आत्मनिर्भर बनवण्याच्या दिशेने महत्त्वाचे ठरू शकतात.
‘रेअर अर्थ’ घटकांची महत्त्वपूर्ण भूमिका
‘रेअर अर्थ’ म्हणजे १७ महत्त्वाच्या धातूंमधील समूह, ज्यामध्ये लॅन्थनाइड्स, स्कॅन्डियम आणि यट्रियम यांचा समावेश होतो. हे घटक २०० हून अधिक प्रगत तंत्रज्ञानावर आधारित उत्पादनांमध्ये आवश्यक असतात. यामध्ये मोबाईल फोन, कंप्युटर हार्ड ड्राइव्ह्स, इलेक्ट्रिक वाहने, फ्लॅट स्क्रीन डिस्प्ले, तसेच लष्करी तंत्रज्ञान – जसे की लेझर, रडार, मार्गदर्शन प्रणाली आणि सोनार यंत्रणा यांचा समावेश होतो. त्यामुळे या खनिजांचा पुरवठा अडथळ्यांमुळे भारताच्या संरक्षण व तंत्रज्ञान क्षेत्रावरही मोठा प्रभाव पडू शकतो.