अदानी समूहावर पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर संशयाची छाया पडली आहे. वॉल स्ट्रीट जर्नल या प्रतिष्ठित अमेरिकन बिझनेस दैनिकानं प्रसिद्ध केलेल्या एका अहवालामध्ये, अदानी समूहाने इराणमधून एलपीजी (LPG) भारतात आयात केल्याचा दावा करण्यात आला आहे. विशेषतः गुजरातमधील मुद्रा बंदरात ही आयात झाल्याचा उल्लेख या अहवालात आहे. हा मुद्दा अमेरिकन निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर गंभीर मानला जात असून, यामध्ये अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी अदानी समूहाची चौकशी सुरू केल्याचा आरोप करण्यात आलाय. इराणवर अमेरिकेनं घातलेले आर्थिक निर्बंध लक्षात घेता, अशा व्यापारावर कायदेशीर परिणाम होण्याची शक्यता आहे.

अदानी समूहाचं स्पष्ट आणि ठाम स्पष्टीकरण

अदानी समूहानं या आरोपांना तत्काळ उत्तर दिलं. २ जून २०२५ रोजी कंपनीकडून अधिकृत स्पष्टीकरण जारी करण्यात आलं, ज्यात त्यांनी वॉल स्ट्रीट जर्नलच्या वृत्ताला “निराधार आणि खोडसाळ” असं संबोधलं. कंपनीच्या म्हणण्यानुसार, “आम्हाला अमेरिकन अधिकाऱ्यांनी कोणतीही चौकशी सुरू केल्याची माहिती नाही.” यासोबतच त्यांनी हेही स्पष्ट केलं की, “इराण किंवा इराणच्या शिपिंग कंपनीशी संबंधित कोणतेही कार्गो आमच्या कोणत्याही बंदरात हाताळले जात नाहीत. आमचं धोरण स्पष्ट आहे—कोणत्याही निर्बंधित देशाशी संबंधित जहाज किंवा माल आमच्या पत्त्यावर हाताळला जात नाही.” एक्स्चेंज फायलिंगमध्ये त्यांनी या धोरणांचा उल्लेख करत हेही सांगितलं की, कंपनी इराणच्या मालकीच्या कोणत्याही जहाजांना कोणतीही सुविधा पुरवत नाही.

शेअर बाजारात मोठा दबाव

या बातमीनंतर अदानी समूहाच्या शेअर्सवर त्वरित परिणाम झाला. मंगळवारी बाजार उघडताच गुंतवणूकदारांमध्ये घबराट पसरली आणि अदानी एंटरप्रायझेसचा शेअर २.२ टक्क्यांनी घसरला, तर अदानी पोर्ट्समध्ये २.५ टक्क्यांपर्यंत घसरण नोंदवण्यात आली. हे दोन्ही शेअर्स निफ्टी निर्देशांकातील सर्वात कमजोर शेअर्स ठरले. याव्यतिरिक्त अदानी टोटल गॅस, अदानी पॉवर, अदानी ग्रीन आणि अदानी एनर्जी सोल्युशन्स या कंपन्यांच्याही शेअर्समध्ये १ ते २ टक्क्यांची घसरण झाली. गुंतवणूकदारांचा विश्वास डळमळीत झाल्याचं यावरून स्पष्ट दिसून आलं.

वॉल स्ट्रीट जर्नलचा अहवाल काय म्हणतो?

वॉल स्ट्रीट जर्नलच्या रिपोर्टमध्ये असे नमूद करण्यात आले आहे की, इराणमधून टँकरद्वारे एलपीजीचे कार्गो भारतात, विशेषतः गुजरातच्या मुद्रा बंदरात, पोहचवले जात आहेत. काही तज्ज्ञांच्या मते, यामुळे अमेरिका घालून दिलेल्या निर्बंधांचं उल्लंघन झालं असण्याची शक्यता आहे. त्यांनी असा दावा केला आहे की, अदानी समूहाच्या काही संबंधित उपक्रमांमुळे हे व्यवहार शक्य झाले असावेत. अदानी पोर्ट्सचा शेअर यावर्षी आतापर्यंत १६ टक्क्यांनी वाढला असला, तरी दुसऱ्या बाजूला अदानी टोटल गॅसमध्ये ११ टक्क्यांची मोठी घसरणही पाहायला मिळाली आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *