पुणे रिअल इस्टेट मार्केटमध्ये एक नवी घडामोड घडली आहे – प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांनी पुण्यातील त्यांचा आलिशान फ्लॅट विकून तब्बल ४२ टक्क्यांचा परतावा मिळवला आहे. अलीकडेच अभिनेता अक्षयकुमारच्या फ्लॅट विक्रीमुळे चर्चेत आलेल्या रिअल इस्टेट क्षेत्रात आता आशा भोसले यांचं नावही झळकू लागलं आहे.
६ कोटी १५ लाखांमध्ये विकला फ्लॅट
सध्या पुण्याच्या आयटी क्षेत्राला लागून असलेल्या उच्चभ्रू परिसरांमध्ये प्रॉपर्टी व्यवहार झपाट्याने वाढत आहेत. याच पार्श्वभूमीवर, आशा भोसले आणि त्यांचे सुपुत्र आनंद भोसले यांनी पुण्यातील पंचशील वन नॉर्थ या प्रतिष्ठित प्रकल्पातील आपला फ्लॅट ६.१५ कोटी रुपयांना विकला आहे. हा फ्लॅट मगरपट्टा सिटीजवळील एक प्रमुख लोकेशन मानला जातो.
२०१३ मध्ये खरेदी, २०२५ मध्ये नफा
सीआरई मॅट्रिक्स या रिअल इस्टेट विश्लेषण संस्थेच्या कागदपत्रांनुसार, भोसले कुटुंबाने हा फ्लॅट २०१३ साली ४.३३ कोटी रुपयांना खरेदी केला होता. सुमारे १२ वर्षांच्या कालावधीत त्यांनी या गुंतवणुकीवर ४२ टक्के दराने नफा मिळवला आहे. मुंबईसारख्या महागड्या शहराच्या तुलनेत पुण्यात मिळालेला हा परतावा उल्लेखनीय मानला जातो.
भव्य फ्लॅट आणि सुविधांचा समावेश
हा फ्लॅट ३,४०१ चौरस फूट क्षेत्रफळाचा असून त्यात १८२ चौरस फूट टेरेस आणि पाच स्वतंत्र पार्किंग स्लॉट्सचा समावेश आहे. १९ व्या मजल्यावरील हा युनिट पुण्यातील गायकवाड कुटुंबाने खरेदी केला असून, हा व्यवहार १४ जुलै २०२५ रोजी अधिकृतरीत्या नोंदणीकृत करण्यात आला. व्यवहाराच्या वेळी ४३ लाख रुपयांपेक्षा अधिक स्टॅम्प ड्युटी आणि ३०,००० रुपये नोंदणी शुल्क भरण्यात आलं.
पुणे रिअल इस्टेट: गुंतवणुकीसाठी नव्याने उभारी
पुण्याचं रिअल इस्टेट मार्केट मागील काही वर्षांपासून सातत्याने विस्तारत आहे. मगरपट्टा, खराडी, हिंजवडी यांसारख्या आयटी हबजवळील परिसरात मोठ्या प्रमाणावर घरे विकली जात आहेत. शहरात वर्क फ्रॉम होमच्या ट्रेंडनंतर अनेक प्रोफेशनल्स पुण्याचा पर्याय निवडू लागले आहेत, यामुळे घरांच्या किमती आणि मागणी दोन्ही वाढल्या आहेत.