सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) ही केंद्र सरकारद्वारे चालवली जाणारी दीर्घकालीन आणि सुरक्षित बचत योजना आहे. यात नियमित आणि शिस्तबद्ध गुंतवणूक केल्यास, तुम्ही केवळ आपले पैसे सुरक्षित ठेवू शकता असे नाही, तर भविष्यकाळासाठी भक्कम निधी तयार करून कोट्यधीशही होऊ शकता. विशेषतः निवृत्तीनंतर नियमित उत्पन्नाची गरज लक्षात घेता, पीपीएफसारखी योजना अत्यंत उपयुक्त ठरते.

PPF योजनेची वैशिष्ट्ये

PPF योजना ही १५ वर्षांची असते, आणि त्यात तुम्ही दरवर्षी कमाल ₹1.5 लाख गुंतवणूक करू शकता. यावर सरकारकडून ठराविक दराने व्याज दिलं जातं – सध्या तो ७.१% (compounded annually) आहे. या योजनेचा आणखी एक फायदा म्हणजे ती ईईई श्रेणीत मोडते – म्हणजेच गुंतवणूक, व्याज आणि मॅच्युरिटीवरील रक्कम हे तिन्ही टप्पे करमुक्त असतात.

१५+५+५ चा फॉर्म्युला म्हणजे काय?

सामान्यतः पीपीएफ योजना १५ वर्षांत मॅच्युअर होते, पण त्यानंतरही खातेदार हे खाते ५ वर्षांच्या कालावधीसाठी दोन वेळा वाढवू शकतो – म्हणजेच एकूण २५ वर्षे. हे वाढवताना खात्यात नियमितपणे गुंतवणूक सुरू ठेवता येते. अशा प्रकारे वाढवलेल्या मुदतीचा फायदा म्हणजे वाढीव व्याज आणि कॉम्पाउंडिंगचा मोठा परिणाम.

गुंतवणुकीचा गणित: दररोज ₹४११, २५ वर्षांत १ कोटी

जर तुम्ही दरवर्षी ₹1.5 लाख (म्हणजे सुमारे दररोज ₹411) पीपीएफमध्ये नियमितपणे गुंतवले, आणि व्याजदर स्थिर राहिला (७.१%), तर १५ वर्षांनंतर तुमचं एकूण गुंतवलेलं भांडवल ₹२२.५ लाख होईल. मात्र, व्याजासह ही रक्कम सुमारे ₹४०.६८ लाखांपर्यंत पोहोचेल.

जर तुम्ही हेच खाते ५+५ वर्षांसाठी वाढवलं, आणि दरवर्षी गुंतवणूक सुरूच ठेवली, तर २५ वर्षांनंतर तुमचं एकूण भांडवल ₹३७.५ लाख आणि व्याजासह एकूण रक्कम सुमारे ₹१.०२ कोटी होईल.

पुढे काय? मासिक उत्पन्न म्हणून ₹६०,०००

२५ वर्षांनंतर जर तुम्ही गुंतवणूक थांबवली आणि फक्त ₹१.०२ कोटींच्या रकमेवर व्याज मिळवायला सुरुवात केली, तर दरवर्षी सुमारे ₹७.३१ लाख व्याजरूपात मिळू शकते. याचा अर्थ दरमहा ₹६०,००० चं मासिक उत्पन्न तयार होऊ शकतं – तेही करमुक्त.

शिस्त, संयम आणि दीर्घकालीन दृष्टिकोन

PPF मधून 1 कोटींचा फंड तयार करणं ही काही झटपट श्रीमंतीची गोष्ट नाही, तर शिस्तबद्ध गुंतवणूक, संयम आणि दीर्घकालीन दृष्टिकोनाचा परिणाम आहे. ही योजना केवळ तुमचं भांडवल सुरक्षित ठेवत नाही, तर एक स्थिर आणि विसंबता येणारा निवृत्तीचा निधी देखील तयार करते.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *