Dr. Shirish Valsangkar Case : सोलापूरच्या ख्यातनाम मेंदूरोगतज्ज्ञ डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येने वैद्यकीय क्षेत्रात आणि संपूर्ण शहरात खळबळ उडवली आहे. 18 एप्रिल रोजी रात्री 8.30 वाजता त्यांनी स्वतःवर गोळ्या झाडून आयुष्य संपवलं. त्यांच्या घरी त्यावेळी आई नेहा उपस्थित होत्या. ही घटना समोर येताच पोलिसांनी तपासाला वेग दिला असून अनेक शक्यता गृहीत धरून काम सुरू आहे.
मुख्य संशयित मनीषा माने-मुसळेच्या चौकशीचा केंद्रबिंदू
या प्रकरणात मनीषा माने-मुसळे ही प्रमुख संशयित म्हणून समोर आली असून सध्या ती न्यायालयीन कोठडीत आहे. पोलिसांकडून तिची चौकशी सुरू असून दररोज कॉल रेकॉर्ड्स, संवाद आणि इतर पुरावे तपासले जात आहेत. मात्र, अद्याप तिच्याविरोधात ठोस पुरावे उपलब्ध झालेले नाहीत. त्यामुळे पोलिसांनी तिची पुन्हा पोलिस कोठडी घेण्यासाठी पुरेशी कारणे सादर करता येतील का, यावर प्रश्नचिन्ह आहे.
पुरावे अजूनही अपुरे, तपास अडथळ्यात
डॉ. वळसंगकर यांच्या रुग्णालयातील कर्मचारी आणि संबंधित लोकांची चौकशी केली असली, तरी अद्याप या प्रकरणात काही निर्णायक माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे तपास पथकासमोर मोठं आव्हान उभं आहे. सध्याच्या घडीला पोलिसांनी घटनेबाबत अतिशय गोपनीयता पाळली असून, कोणतीही माहिती माध्यमांसमोर येऊ दिली जात नाही.
नवा तपास अँगल समोर
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस आता या प्रकरणाकडे दुसऱ्या दृष्टीने पाहत आहेत. आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकर दीर्घ काळ तणावाखाली होते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यांच्या मानसिक स्थितीवर परिणाम करणाऱ्या घटकांचा शोध घेतला जात असून, मनीषाशिवाय आणखी कोण त्यामागे होते का, याचा शोध सुरू आहे.
मृत्यूपूर्वीचे बदललेले निर्णय
घटनेच्या काही दिवस आधी डॉ. वळसंगकर यांनी मृत्यूपत्र बदलल्याची महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. यावरून त्यांच्याच मनात आत्महत्येचा विचार आधीपासून सुरू होता का, हे तपासात महत्त्वाचं ठरणार आहे. त्यांच्या मुलीच्या अचानक आगमनानेही संशयाला वाव मिळाल्याचं सूत्रांकडून कळते.