२०१८ मध्ये सुरू झालेली आयुष्मान भारत योजना ही मोदी सरकारची महत्वाकांक्षी योजना असून तिचा उद्देश आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित घटकांना मोफत, दर्जेदार आरोग्य सेवा पुरवणे हा आहे. ही योजना प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PM-JAY) या नावानेही ओळखली जाते. जगातील सर्वात मोठ्या सरकारी आरोग्य विमा योजनांपैकी ही एक आहे. आयुष्मान कार्डच्या माध्यमातून पात्र नागरिकांना ५ लाख रुपयांपर्यंतचे आरोग्य विमा संरक्षण मोफत दिले जाते. मात्र, हा लाभ सर्वांसाठी खुला नाही. काही विशिष्ट निकषांनुसारच नागरिकांना या योजनेत समाविष्ट केले जाते.
कोणाला मिळणार नाही आयुष्मान कार्ड?
जरी ही योजना व्यापक आहे, तरीही काही लोक या योजनेच्या लाभासाठी पात्र नाहीत. संघटित क्षेत्रात कार्यरत असलेले कर्मचारी, जे नियमितपणे आयकर भरतात, ज्यांचे वेतन PF साठी कापले जाते किंवा जे ESIC (Employees’ State Insurance Corporation) चा लाभ घेतात, अशा लोकांना आयुष्मान योजनेचा लाभ मिळत नाही. या योजनेचा मुख्य उद्देश आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना संरक्षण देणे असल्याने मध्यम व उच्च उत्पन्न गटातील लोक यामधून वगळलेले आहेत. त्यामुळे, जर तुम्ही या घटकांपैकी एक असाल, तर तुमचं नाव लाभार्थ्यांच्या यादीत असण्याची शक्यता कमी असते.
५ लाख रुपयांपर्यंतचे विमा संरक्षण आणि वयोवृद्धांसाठी विशेष योजना
आयुष्मान भारत योजनेअंतर्गत पात्र नागरिकांना वार्षिक ५ लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार मिळतात. यामध्ये हॉस्पिटलायझेशन, सर्जरी, डायग्नोस्टिक सेवा आणि औषधांचा समावेश आहे. सप्टेंबर २०२४ मध्ये सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. ७० वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या सर्व ज्येष्ठ नागरिकांना उत्पन्नाची अट न लावता “आयुष्मान वय वंदन कार्ड” अंतर्गत या योजनेत समाविष्ट करण्यात आले. त्यामुळे वृद्ध व्यक्तींना आरोग्याच्या बाबतीत मोठा दिलासा मिळाला आहे.
लाभार्थ्यांची यादी कशी ठरते?
आयुष्मान भारत योजनेतील लाभार्थ्यांची निवड ही “सामाजिक-आर्थिक आणि जात जनगणना २०११” (SECC-2011) च्या आधारे केली जाते. ग्रामीण भागातील कच्च्या घरांमध्ये राहणारे कुटुंब, ज्यामध्ये १६ ते ५९ वयोगटातील कोणताही प्रौढ पुरुष नाही, अनुसूचित जाती व जमातीतील कुटुंबे, भूमिहीन कामगार ही पात्र लाभार्थी आहेत. शहरी भागात कचरा वेचणारे, घरकाम करणारे, रस्त्यावरील विक्रेते, बांधकाम कामगार इत्यादी असंघटित क्षेत्रात कार्यरत कुटुंबेही योजनेच्या लाभासाठी पात्र मानली जातात.
तुमचं नाव यादीत आहे का? ऑनलाईन तपासण्याची प्रक्रिया
जर तुम्हाला हे जाणून घ्यायचे असेल की तुम्ही आयुष्मान भारत योजनेसाठी पात्र आहात का, तर ही माहिती तुम्ही घरबसल्या ऑनलाईन तपासू शकता. सर्वप्रथम तुम्हाला अधिकृत वेबसाइट https://pmjay.gov.in या पोर्टलवर जावे लागेल. तेथे ‘Am I Eligible’ या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर तुमच्याकडून काही मूलभूत माहिती विचारली जाईल जसे की तुमचा मोबाईल नंबर, राज्य, जिल्हा इत्यादी. ही माहिती भरल्यानंतर तुम्हाला तुमचं नाव लाभार्थी यादीत आहे की नाही हे स्पष्टपणे दाखवले जाईल. जर नाव सापडले, तर तुम्ही आयुष्मान कार्डसाठी पात्र आहात आणि संबंधित प्राधिकरणामार्फत ते मिळवू शकता.