शेअर बाजार हे अर्थव्यवस्थेचं आरसासारखं असतं—देशांतर्गत आणि जागतिक घटनांवर आधारित त्याचं चढ-उतार होत असतो. अनेक वेळा काही प्रचंड घडामोडीमुळे बाजारात एकाच दिवशी घसरण होते, ज्याचा थेट परिणाम कोट्यवधी गुंतवणूकदारांच्या संपत्तीवर होतो. भारताच्या शेअर बाजाराच्या इतिहासात काही अशा पाच घटना आहेत, ज्या आजही “क्रॅश” म्हणून ओळखल्या जातात. या घटना केवळ आकड्यांपुरत्या मर्यादित नसून, त्या वेळच्या गुंतवणूकदारांच्या भावनांवर आणि संपूर्ण अर्थव्यवस्थेवर खोल परिणाम करणाऱ्या ठरल्या.
१. हर्षद मेहता घोटाळा (१९९२)
१९९२ मध्ये हर्षद मेहता नावाच्या स्टॉक ब्रोकर्सने केलेला सुमारे ४००० कोटी रुपयांचा घोटाळा उघडकीस आला आणि संपूर्ण देश हादरला. या प्रकरणामुळे बाजारात मोठ्या प्रमाणात विश्वासघात झाला.
२८ एप्रिल १९९२ रोजी सेन्सेक्समध्ये तब्बल ५७० अंकांची (१२.७%) घसरण झाली.
ही एकाच दिवशीची सर्वात मोठी टक्केवारीतील घसरण होती.
यामुळे हजारो छोट्या गुंतवणूकदारांचे नुकसान झाले आणि आर्थिक धोरणांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले.
२. केतन पारेख घोटाळा (२००१)
हर्षद मेहताच्या पाठोपाठच २००१ मध्ये केतन पारेख या ब्रोकरच्या घोटाळ्यामुळे बाजार पुन्हा एकदा धोक्यात आला. पारेखने काही निवडक शेअर्समध्ये कृत्रिमरीत्या तेजी निर्माण करून बाजारात फसवणूक केली होती.
त्यानंतर १७६ अंकांची (३.७%) घसरण झाली.
या काळात गुजरातमध्ये आलेल्या भूकंपानेही गुंतवणूकदारांचा विश्वास डळमळीत केला.
हा घोटाळा बाजार नियमन संस्थांवर मोठा ताण आणणारा ठरला.
३. निवडणूक निकाल धक्का (२००४)
२००४ साली लोकसभा निवडणुकीत एनडीएच्या पुनरागमनाची अपेक्षा होती. मात्र, युपीएला बहुमत मिळाल्याने बाजारात अनिश्चिततेचं वातावरण निर्माण झालं.
१७ मे २००४ रोजी सेन्सेक्सने एकाच दिवशी ८४२ अंकांची (११.१%) घसरण केली.
हा निकाल बाजाराच्या अंदाजाच्या विरोधात गेला आणि त्याचा थेट परिणाम गुंतवणुकीवर झाला.
राजकीय स्थैर्य आणि धोरणात्मक दिशाबदल यांचे अर्थव्यवस्थेवर किती खोल परिणाम होतात, याचे हे उत्तम उदाहरण ठरले.
४. जागतिक आर्थिक मंदी (२००८)
लेहमन ब्रदर्स या अमेरिकन कंपनीच्या दिवाळखोरीच्या बातमीने संपूर्ण जगातील आर्थिक व्यवस्थेला जबरदस्त धक्का बसला.
२१ जानेवारी २००८ रोजी सेन्सेक्स १४०८ अंकांनी (७.४%) घसरला.
या कालावधीत सेन्सेक्सने पुढील काही महिन्यांत सुमारे ६०% घट अनुभवली.
गुंतवणूकदारांच्या संपत्तीत हजारो कोटी रुपयांची घट झाली आणि अनेक म्युच्युअल फंड, ब्रोकिंग फर्म्स अडचणीत आल्या.
या मंदीने भारतीय अर्थव्यवस्थेचा आत्मविश्वास काही काळासाठी ढासळवला.
५. कोविड-१९ महामारीचा धक्का (२०२०)
२०२० मध्ये आलेल्या कोरोनाच्या महासाथीमुळे संपूर्ण जग ठप्प झालं. लॉकडाऊन, व्यापार ठप्प होणं आणि आर्थिक घडामोडींचा अभाव यामुळे बाजारात अभूतपूर्व घसरण झाली.
२३ मार्च २०२० रोजी सेन्सेक्स ३९३५ अंकांनी (१३.२%) घसरला.
ही भारतीय शेअर बाजाराच्या इतिहासातील टक्केवारीतील सर्वात मोठी घसरण होती.
या घसरणीमुळे केवळ भारतातच नव्हे, तर संपूर्ण जगात गुंतवणूकदारांचे अब्जावधी डॉलर्सचे नुकसान झाले.