कॉर्पोरेट हेल्थ इन्शुरन्सचा मूलभूत अर्थ
कॉर्पोरेट हेल्थ इन्शुरन्स ही एक अशी सामूहिक आरोग्य विमा योजना असते जी कंपन्या त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी घेतात. ही योजना प्रामुख्याने कर्मचारी आणि त्याच्या कुटुंबियांच्या वैद्यकीय खर्चासाठी कवच देते. यामध्ये हॉस्पिटलायझेशन, डे-केअर ट्रीटमेंट, प्री आणि पोस्ट-हॉस्पिटलायझेशनचा खर्च यांचा समावेश असतो. काही कंपन्या या योजनेत मुलं, पत्नी/पती, तसेच पालकांचाही समावेश करतात.
नोकरी सोडल्यानंतर आरोग्य विम्याचे काय होते?
जेव्हा एखादा कर्मचारी राजीनामा देतो किंवा त्याची नोकरी जाते, तेव्हा कंपनीद्वारे दिली जाणारी ही कॉर्पोरेट आरोग्य विमा पॉलिसी तात्काळ थांबते. कारण, ही विमा योजना कर्मचाऱ्यांच्या सेवकाळासाठीच वैध असते. त्यामुळे कर्मचारी कंपनीत काम करत असताना त्याचा लाभ घेऊ शकतो, पण नोकरी संपताच विमा कवच आपोआप बंद होते.
टॉप-अप पॉलिसीबाबत विचार
काही कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना मूलभूत विमा योजनेशिवाय अतिरिक्त टॉप-अप पॉलिसी खरेदी करण्याची संधी देतात. यात कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या खिशातून अतिरिक्त प्रीमियम भरून विमा रक्कम वाढवलेली असते. अशा प्रकरणात, कर्मचारी नोकरी सोडल्यावर टॉप-अप पॉलिसीचे पैसे परत मिळतील का, हे संबंधित विमा कंपनीच्या धोरणांवर अवलंबून असते. काही कंपन्या टॉप-अप प्रीमियम रिफंड करतात, तर काही कंपन्या रिफंड करत नाहीत. त्यामुळे नोकरी सोडण्यापूर्वी विमा कंपनीकडून किंवा एचआर विभागाकडून याबाबत स्पष्ट माहिती घेणे गरजेचे आहे.
वैयक्तिक आरोग्य विम्यामध्ये रूपांतराचा पर्याय
काही विमा कंपन्या ग्रुप हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीला वैयक्तिक पॉलिसीमध्ये रूपांतर करण्याची सुविधा देतात. ही प्रक्रिया “पोर्टेबिलिटी” किंवा “रूपांतरण” म्हणून ओळखली जाते. जर कर्मचारी कंपनी सोडण्याच्या विचारात असेल, तर त्याने आधीच HR किंवा विमा एजंटकडून माहिती घेऊन, ही पॉलिसी वैयक्तिक आरोग्य पॉलिसीमध्ये बदलता येईल का हे तपासून पाहावे.
वैयक्तिक पॉलिसीमध्ये रूपांतराचे फायदे
ग्रुप पॉलिसी वैयक्तिक पॉलिसीमध्ये रूपांतरित झाल्यास, एक मोठा फायदा म्हणजे प्रतीक्षा कालावधी (वेटिंग पिरियड) लागू होत नाही. सामान्यतः नवीन वैयक्तिक विमा घेतल्यास प्री-एक्सिस्टिंग आजारांसाठी प्रतीक्षा कालावधी लागतो, जो 2 ते 4 वर्षांपर्यंत असतो. मात्र, कॉर्पोरेट पॉलिसीतून वैयक्तिक पॉलिसीमध्ये गेल्यास हा कालावधी लागू न होता, त्वरित संरक्षण मिळू शकते.